न्यायालयाच्या आदेशानुसार साबांखाची कारवाई
वार्ताहर/कांदोळी
नेरूल येथील पुलाजवळील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जागेतील 31 अतिक्रमणे काल बुधवारी बुलडोझरद्वारे जमिनदोस्त करण्यात आली. काही दिवसापूर्वी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे येथील अतिक्रमण जागा रिकामी करण्याची नोटिस जारी करण्यात आली होती. त्यानुसार काल बुधवारी सकाळी 9.30 वाजल्यापासून ही धडक कारवाई करण्यात आली होती. काही दुकान मालकांनी आपणहून आपली दुकाने रात्रीच्यावेळी हटवण्यास प्रारंभ केला होता. या प्रमुख रस्त्यावर बेकायदेशीरपणे दुकाने थाटण्यात आली होती. त्याप्रमाणे सदर अतिक्रमण धारकास अतिक्रमण हटविण्यास कारणे दाखवा नोटीस दिली होती. त्यानुसार ही अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत.









