ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 31 मार्चपासून देशातील सर्व निर्बंध हटविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तब्बल दोन वर्षांनी जनता निर्बंधमुक्त होणार आहे. पण नागरिकांना मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार आहे.
देशातील कोरोना रुग्णांमध्ये कमालीची घट नोंदवली गेली आहे. मंगळवारी दिवसभरात देशात 1778 नवे रुग्ण आढळून आले. तर 2542 रुग्ण बरे झाले. सध्या देशात 23 हजार 87 सक्रीय रुग्ण आहेत. पण रुग्ण बरे होणाचा दरही चांगला असल्याने केंद्र सरकारने डिजास्टर मॅनेजमेंट ॲक्ट हटविण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांच्या पत्रात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना DM कायद्यांतर्गत जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे काढून टाकण्यास सांगितले आहे. पण कोरोनाचे रुग्ण वाढू लागले तर निर्बंध पुन्हा लावण्याचा अधिकार राज्यांना देण्यात आला आहे.
दरम्यान, देशात जूनमध्ये कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता आयआयटी कानपूरच्या अभ्यासातून समोर आली आहे. पण लसीकरणामुळे बाधितांचे रुग्णालयात दाखल होण्याचे अथवा मृत्यूचे प्रमाण खूपच कमी असेल. नवीन व्हेरिएंटचा संभाव्य धोका वगळता चौथी लाट सौम्य असेल, असे अभ्यासकांकडून सांगण्यात येते.