प्रतिनिधी / सातारा :
31 डिसेंबर अवघ्या तीन दिवसांवर आला असून नववर्षाच्या स्वागतासाठी तरूणाईसह सर्वच जण उत्साहात आहेत. या उत्साहात ओल्या-सुक्या पार्ट्यांचा जोर कायम असल्याने विपरीत घटनांना आमंत्रण मिळत आहे. या पाटर्या वनविभागाच्या क्षेत्रात करण्यावर जोर असतो. परंतु यंदा विनविभागाने ठोस पावले उचलत अशा पार्टी करताना कोणीही आढळल्यास घटनास्थळावरून साहित्य जप्त करत संबंधितावर गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा सातारा तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ. निवृत्ती चव्हाण यांनी प्रसिद्धी प्रत्रकाद्वारे दिला आहे.
प्रसिद्धी पत्रकात म्हटले की, सातारा तालुक्यातील काही भाग सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये मोडला जातो. त्यामध्ये वनविभागाचे क्षेत्र अधिक आहे. प्रामुख्याने यवतेश्वर, महादरे गाव परिसर, कास, उरमोडी धरण परिसर, ठोसेघर, मालदेव, चाळकेवाडी या प्रसिद्ध ठिकाणाचा समावेश आहे. 31 डिसेंबर रोजी या ठिकाणी तरूण मोठय़ा संख्येने या क्षेत्रात नववर्षाचे स्वागत करण्यासाठी येत असतात. चुलीवर स्वयंपाक करणे, फटाक्यांची आतिषबाजी करणे, पेटत्या सिगारेटचे धोटके उघडय़ावर टाकणे यामुळे वनक्षेत्रात आग लागून मोठय़ा प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे वन्य प्राण्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन ते सैरभैर होत आक्रमक होऊ शकतात. परिणामी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. 31 डिसेंबर साजरी करण्यासाठी वनविभागाचा विरोध नाही. मात्र त्याचे निमित्त साधून वनक्षेत्रामध्ये वन क्षेत्रांमध्ये चुली पेटवणे, आतिषबाजी करणे याला निर्बंध आहेत. त्यामुळे या दिवशी वन क्षेत्रांमध्ये पाटर्या करू नयेत. अन्यथा घटनास्थळावरील साहित्य हस्तगत करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा डॉ. निवृत्ती चव्हाण यांनी दिला आहे. या दिवशी दिवस आणि रात्र वन विभागाचे कर्मचारी साध्या वेशात पेट्रोलिंग करणार असून अशा प्रकारचे कृत्य करताना कोणी आढळून आल्यास त्यांची गय केली जाणार नाही. असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.









