एफ-15 लढाऊ विमान तयार करणारी कंपनी
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
पूर्ण जगाशी शत्रुत्व पत्करणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे स्वत:च्या लढाऊ विमानांबद्दल तोरा मिरवत असतात. एफ-15 लढाऊ विमान आणि अन्य सैन्यविमाने तयार करणारी कंपनी बोइंग डिफेन्सचे 3 हजारांहून अधिक कर्मचारी आता संपावर गेले आहेत. हे कर्मचारी वेतन, कामाची वेळ आणि पेन्शनवरून कंपनीच्या प्रस्तावावर समाधानी नाहीत. बोइंग कंपनी यापूर्वीच अनेक समस्यांना सामोरी जात आहे. अलिकडच्या वर्षांमध्ये या कंपनीची अनेक विमाने दुर्घटनाग्रस्त झाली आहेत. यामुळे कंपनीबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
कंपनीने वेतनात 40 टक्के सरासरी वाढ करण्याचा प्रस्ताव दिला होता, परंतु कर्मचाऱ्यांनी तो फेटाळला असल्याचे बोइंगच्या एअर डोमिनेन्स युनिटचे उपाध्यक्ष डॅन गिलियन यांनी सांगितले आहे. बोइंग अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करत असून यात कंपनीच्या विमानांच्या सुरक्षेशी निगडित मुद्दे सामील आहेत. मागील वर्षी कंपनीचे हजारो कर्मचारी 8 आठवड्यांपर्यंत संपावर गेले होते. आता बोइंग डिफेन्सच्या सेंट लुई युनिटचे 3200 कुशल कर्मचारी संपावर गेले आहेत. सेंट लुइस, सेंट चार्ल्स, मिसौरी, मस्काउटला, इलिनोइस येथील बोइंग प्रकल्पांमधील सुमारे 3200 कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला आहे.
29 वर्षांमध्ये पहिला संप
1996 नंतर पहिल्यांदाच बोइंग डिफेन्सचे कर्मचारी संपावर गेले आहेत. परंतु कंपनीचे सीईओ केली ओर्टबर्ग यांच्यानुसार या संपाचा कंपनीच्या कामकाजावर फारसा प्रभाव पडणार नाही. मागील वर्षाच्या तुलनेत कमी तीव्रतेचा संप आहे. मागील वर्षी कंपनीचे सुमारे 30 हजर पॅसेंजर जेट वर्कर्स संपावर गेले होते, ज्यामुळे कंपनीला अब्जावधी डॉलर्सचे नुकसान झाले होते. मागील वर्षी कंपनीने केवळ 348 विमाने डिलिव्हर केली होती.









