स्पेशल रेल्वे सुरू करण्याकडे दुर्लक्ष : प्रवाशांची मात्र गैरसोय
प्रतिनिधी / बेळगाव
दिवाळीसाठी गावी परतणाऱया नागरिकांना प्रवास करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. दादर-हुबळी एक्स्प्रेससाठी 20 ते 23 ऑक्टोबरपर्यंत 300 च्या वर वेटींग लागले आहे. इतकी प्रचंड मागणी असतानाही दिवाळी स्पेशल रेल्वे सुरू करण्याकडे नैर्त्रुत्य रेल्वे तसेच मध्य रेल्वेचेही दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांची मात्र गैरसोय होत आहे.
दिवाळीमध्ये महाराष्ट्रातील कंपन्या, उद्योग, व्यवसाय यांना सुट्टय़ा असतात. त्यातच यावषी शनिवार रविवारच्या साप्ताहिक सुटीला जोडून दिवाळी सण आल्याने सलग सुट्टय़ा मिळणार आहेत. मुंबई, पुणे व बेंगळूर येथून बेळगावमध्ये येणाऱया रेल्वेचे बुकिंग सध्या वेटींगवर आहे. कोणत्याच एक्स्प्रेसचे तिकीट मिळत नसल्याने प्रवाशांना नाईलाजास्तव अधिकचे पैसे खर्च करून खासगी ट्रव्हल्सने प्रवास करावा लागणार.
दादर-बेळगाव या मार्गावर गुरुवार दि. 20 रोजी हुबळी एक्स्प्रेसला स्लीपर क्लाससाठी 258 वेटींग, एसी थ्री टायरसाठी 62, एसी टू टायरसाठी 31 तर फर्स्ट क्लाससाठी 8 वेटींग आहे. हीच परिस्थिती शरावती एक्स्प्रेसचीदेखील आहे. दि. 20, 21, 22 व 23 असे चारही दिवस रेल्वेचे बुकिंग फुल्ल झाले असून वेटींग आहे.
बेंगळूर -बेळगाव या मार्गावरही 20 ते 23 पर्यंत रेल्वेचे सर्व बुकिंग फुल्ल आहे. त्यामुळे दिवाळी उत्सवानिमित्त किमान यशवंतपूर-बेळगाव व दादर-हुबळी या मार्गावर स्पेशल रेल्वे सुरू केल्यास प्रवाशांची गैरसोय दूर होईल.









