सहा सत्रातील तेजीला ब्रेक ः रिलायन्स, महिंद्रा तोटय़ात
वृत्तसंस्था/ मुंबई
गेले सहा दिवस तेजी राखून व्यवहार करणारा भारतीय शेअर बाजार सोमवारी घसरणीसह बंद झाला. जागतिक बाजारातील मिळताजुळता कल व विक्रीच्या जोरावर दोन्ही निर्देशांक घसरणीत बंद झाले.
जागतिक बाजारांतील सावधगिरीच्या पावलांचा परिणाम शेअर बाजारात काहीअंशी नकारात्मक दिसून आला. यादरम्यान सरतेशेवटी सोमवारी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स 306 अंकांच्या घसरणीसह 55,766.22 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 88 अंकांच्या घसरणीसह 16,631 अंकांवर बंद झालेला पाहायला मिळाला. सध्याला गेल्या काही दिवसांपासून विविध कंपन्यांचे नफ्याचे निकाल जाहीर होत आहेत. तिमाही निकालानंतर विक्रीवर जोर दिसून आला. दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रिज आणि महिंद्रा आणि महिंद्रा यांच्या समभागांमध्ये विक्रीचा क्रम दिसला. यानेच बाजारामध्ये घसरणीचा मूड तयार केला.
सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी बाजाराची सुरूवातच नुकसानीसह झाली होती. सलग सहा सत्रे ही शेअर बाजाराची तेजीची राहिली होती. बँक, वित्त, ऑटो, फार्मा तसेच रियल्टी क्षेत्रातील समभागांवर सोमवारी दबाव दिसून आला. निफ्टीत ऑटो निर्देशांक जवळपास दीड टक्के इतका घसरलेला होता. यात धातू आणि आयटी निर्देशांक तेजीसह बंद झालेले पाहायला मिळाले. दुसरीकडे रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत चढलेला पाहायला मिळाला. 9 पैसे वाढत रुपया 79.81 वर पोहचला होता.
युरोपियन बाजार तेजीत
जागतिक बाजारांचा विचार करता अमेरिकेतील बाजारात घसरण होती. युरोपियन बाजार वाढीसह कार्यरत होते तर आशियाई बाजारात निक्की 215 अंक, हँगसेंग 46 व शांघाई कम्पोझीट 19 अंकांनी घसरलेला दिसला तर कोस्पी मात्र 10 अंकांनी तेजीत होता.









