दुर्घटनेप्रकरणी 9 जणांना अटक : अवैधमार्गाने युरोपमध्ये पाठविण्याचा आरोप
वृत्तसंस्था/ अथेन्स/इस्लामाबाद
ग्रीसनजीक 14 जून रोजी नौका बुडून झालेल्या दुर्घटनेत पाकिस्तानच्या 300 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. संबंधित नौकेतून पाकिस्तानचे 400 तर इजिप्तचे 200 आणि सीरियाचे 150 नागरिक प्रवास करत होते. नौका दुर्घटनेत पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाल्याने पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
मानव तस्करांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे. हा अत्यंत क्रूर अपराध असल्याचे शाहबाज यांनी म्हटले आहे. पाकिस्तानात पीओकेमधून 9 मानव तस्करांना अटक करण्यात आली आहे. अवैधमार्गाने पाकिस्तानी नागरिकांना युरोपमध्ये पोहोचविण्याचा प्रयत्न करण्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. पाकिस्तानने स्वत:च्या नागरिकांच्या मृत्यूप्रकरणी सोमवारी राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.
नौका दुर्घटनेतून 12 जण बचावले असून यात काही पाकिस्तानी नागरिकांचा समावेश आहे. संयुक्त राष्ट्रसंघानुसार नौकेतून 400 ते 750 जण प्रवास करत होते. यातील 200 हून अधिक जण पाकिस्तानी होते. आतापर्यंत 78 जणांचे मृतदेह हाती लागले असून 500 जण अद्याप बेपत्ता आहेत.

या 500 पैकी कुणी बचावले असण्याची शक्यता धूसर आहे. पाकिस्तानी नागरिकांना जाणूनबुजून नौकेच्या खाली भागात पाठविण्यात आले होते, तेथे बचावण्याची शक्यता जवळपास नसते. नौकेच्या कर्मचाऱ्यांनी हा प्रकार जाणूनबुजून केला असल्याचे मानले जात आहे. पीओकेतील तस्कर पाकिस्तानी नागरिकांना युरोपमध्ये पाठविण्याचे स्वप्न दाखवून प्रथम त्यांना लीबिया येथे पोहोचवितात, मग नौकेद्वारे अवैध मार्गाने त्यांची युरोपमध्ये घुसखोरी घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो.
पाकिस्तानच्या गुजरातमधून देखील एका तस्कराला अटक करण्यात आली आहे. तस्करांनी संबंधित लोकांकडून 6 लाख रुपये उकळले होते. सियालकोट येथील एक युवकाने एजंटला 6 लाख रुपये देत इटलीत जाण्याचे स्वप्न बाळगले होते, हा युवक आता बेपत्ता असून एजंट फरार झाला आहे.
2015 नंतरची सर्वात मोठी दुर्घटना
संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका संस्थेनुसार ग्रीसनजीक नौका उलटल्याने ही दुर्घटना 2015 नंतरची सर्वात मोठी दुर्घटना आहे. 2015 मध्ये लीबिया येथून इटलीच्या दिशेने जात असलेली नौका उलटल्याने 1100 जणांचा मृत्यू झाला होता. वारंवार दुर्घटना होत असून देखील लोक जीव जोखिमीत टाकून उत्तम आयुष्याच्या शोधात युरोपमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतात.









