चन्नम्मा चौक परिसरात सर्वाधिक चोरीच्या घटना
बेळगाव : राज्योत्सव मिरवणुकीत यंदा मोबाईल चोरीचे गेल्या वर्षीचे रेकॉर्ड मोडले आहे. एका राणी चन्नम्मा चौक परिसरात शनिवारी सायंकाळनंतर 300 हून अधिक मोबाईल चोरल्याची माहिती उपलब्ध झाली असून त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. या चोऱ्यांमागे हावेरी जिल्ह्यातील हानगलची टोळी कार्यरत असणार, असा संशय आहे. खडेबाजार, मार्केट कॅम्प, एपीएमसी पोलीस स्थानकांच्या कार्यक्षेत्रात या घटना घडल्या आहेत. राणी चन्नम्मा चौकचा वेगवेगळा परिसर या चार पोलीस स्थानकांच्या कार्यक्षेत्रात येतो. मोबाईल गमावलेल्या नागरिकांची या चारही पोलीस स्थानकात गर्दी झाली आहे. खासकरून खडेबाजार पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात चोरीच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत.
शनिवार दि. 1 नोव्हेंबरच्या दुपारपासून रविवारी सायंकाळपर्यंत एका खडेबाजार पोलीस स्थानकात 190 हून अधिक जणांनी आपल्या विविध कंपन्यांचे मोबाईल मिरवणुकीत चोरीला गेल्याची तक्रार नोंदविली आहे. रात्री उशिरापर्यंत मोबाईल चोरीची तक्रार घेऊन येणाऱ्यांचा ओघ सुरूच होता. खासकरून शनिवारी सायंकाळी 6 ते 8 या वेळेत चोरीच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत. चन्नम्मा सर्कलपासून काकतीवेसकडे येणारा मार्ग खडेबाजार पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात येतो. याच मार्गावर चोरीच्या अधिकाधिक घटना घडल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारा मार्ग मार्केट पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात येतो. या परिसरात 60 हून अधिक जणांचे मोबाईल चोरीला गेले आहेत. एपीएमसी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात 5, कॅम्प पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात 3 मोबाईल चोरल्याची माहिती मिळाली आहे.
कोणत्याही मोठ्या शहरात एखादी मोठी मिरवणूक असली की हानगल, जि. हावेरी येथील मोबाईल चोरांची टोळी त्या शहरात जाते. चोरी करून हे गुन्हेगार त्या शहरातून बाहेर पडतात. नंतर काही दिवसांनी त्यांची विक्री करतात. तक्रार देण्यासाठी खडेबाजार पोलीस स्थानकात आलेल्या काही तरुणांच्या मते चोरी होऊन केवळ काही मिनिटातच मोबाईल बंद करण्यात आले आहेत. मोबाईल चोरीनंतर लगेच तो स्वीचऑफ करण्यात येतो. कारण एखाद्या पोलीस स्थानकातून हरवलेल्या किंवा चोरीस गेलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली तर मोबाईल सुरू असल्यास त्याचे लोकेशन समजते. म्हणून गुन्हेगार चोरीनंतर लगेच सीमकार्ड काढतात. रविवारी तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या अनेकांनी आवश्यक कागदपत्रे आणली नव्हती. त्यामुळे त्यांना सोमवारी बोलावण्यात आले आहे. चोरीचा आकडा 300 पार होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी दीडशेहून अधिक मोबाईल चोरी झाले होते.









