थेट सरपंच निवडीमुळे वाढली चुरस : मतदारांना हजारोंचे मोल
मोठय़ा गावांमध्ये लाखोंचा खर्च
कोल्हापूर / प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्हय़ात सुमारे तीनशे कोटींचा चुराडा झाला. थेट सरपंच निवडीमुळे निवडणुकीतील चुरस वाढल्याने मतदारांना हजारोंचे मोल प्राप्त झाले. मोठया लोकसंख्येच्या गावांमध्ये तर सरपंचांसह चुरशीची लढत असणाऱया प्रभागातील उमेदवारांचा प्रचार यंत्रणेसह जेवणावळी, मताच्या दरांचा खर्च वीस ते चाळीस लाखांच्या घरात गेला असल्याची चर्चा जिल्हय़ात आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून जिल्हय़ात करोडो रुपयांची आर्थिक उलाढाला झाली.
काही हजारात होणाऱया ग्रामपंचायत निवडणुकीला आता लाखोंचे मोल प्राप्त झाले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीची निवडणुक देखील सर्वसामान्यांसाठी सोपी राहिली नाही. यंदाच्या झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील खर्चाची चर्चा सध्या जिल्हय़ात रंगली आहे. प्रचाराचे साहित्य, यंत्रणा, मतदारांसाठी रोज होणाऱ्या जेवणावळी, मतदारांचे वाढलेले मोल यावर झालेल्या खर्चाची आकडेवारी पाहिली तर ग्रामपंचायत निवडणुकीचेही मोल वाढल्याचे लक्षात येते.
ओल्या, सुक्या जेवणावळींवरच लाखात खर्च
निवडणुक प्रचाराच्या दहा दिवसांत ओल्या व सुक्या जेवणावळींना ऊत आला. शहरासह ग्रामीण भागातील हॉटेल याकाळात हाऊसफुल्ल असल्याचे दिसून आले.अनेक उमेदवारांनी तर जेवणावळीसाठी हॉटेलच बुक केली होती. त्यामुळे प्रचार काळात ओल्या व सुक्या जेवणावळींवर उमेदवारांचा लाखत खर्च गेला असल्याची चर्चा आहे.
मतदाराचे मोल पाच हजारापर्यंत
सरपंच अथवा सदस्य पदासाठी ज्या ठिकाणी चुरशीची लढत झाली, त्या वॉर्ड किंवा गावांमधील मतदारांना मोठे मोले आहे. एका एका मतासाठी उमेदवारांची घालमेल सुरु होती. प्रचाराचा धुरळा संपल्यानंतर उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी रात्री जागवून काढत मतदान फोडाफोडीचे राजकारण केले. ज्या ठिकाणी समान्य उमेदवार होता तेथे मतदारांचे मोल किमान पाचशे रुपये होते. तर ज्या ठिकाणी तुल्याबळ उमेदवार होते त्या ठिकाणी एका मताचे मोल पाच हजार पर्यंत गेल्याचीही चर्चा चांगलीचे रंगली आहे.
दोन लाखांपासून चाळीस लाखांपर्यंत खर्च
लहान गावे, अथवा ज्या वॉर्डमध्ये चुरस नाही अशा उमेदवारांचाही कमीत कमी दोन लाखांपर्यंत झाला आहे. तर तुल्यबळ व घासाघासीत निवडणुक असलेल्या उमेदवारांचा खर्च तीस ते चाळीस लाखांच्या घरात गेला आहे.
बिनविरोधसाठीही लाखांत खर्च
जिल्हय़ातील अनेक गांवांमध्ये सरपंच आणि सदस्य निवड बिनविरोध झाली. मात्र या निवडीही सहज सोप्या झाल्या नाहीत. प्रतिस्पर्धी उमेदवाराला मागार घेण्यासाठीही त्यांना लाखात पैसे मोजावे लागले. सरपंच पदाच्या सेटलमेंटसाठी दोन ते दहा लाखांपर्यंत तर सदस्य पदासाठी पन्नास हजारपासून दोन लाखांपर्यंत उमेदवारांनी पैसे मोजल्याची चर्चा आहे.
तीनशे कोटींचा चुरडा
जिल्हय़ातील 429 ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदासाठी 1193 तर सदस्य पदासाठी 8995 उमेदवारांनी निवडणुक लढली. यामध्ये सरपंचपदासाठी किमान दोन लाख ते चाळीस लाखांपर्यंत आणि सदस्य पदासाठी किमान एक लाख ते जास्तीत जास्त दहा लाखांपर्यंत खर्च धरला तर ग्रामपंचायती निवडणुकीत सुमारे तीनशे कोटींचा चुराडा झाल्याचे चित्र आहे.









