मुख्यमंत्री डॉ. प्रमोद यांची माहिती : विविध योजनांचा समावेश,गृह आधारचे नवे लाभार्थी साडेअकरा हजार,एकूण लाभार्थी दीड लाखाच्या घरात
मडगाव : राज्यातील लोकांच्या म्हणजेच सामाजिक कल्याणासाठी गृह आधार, कृषी अनुदान, मत्स्यव्यवसाय अनुदान, दूध प्रोत्साहन, शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. यासाठी सुमारे 300 कोटी ऊपयांचा निधी जारी करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मडगाव रवींद्र भवनात आयोजित केलेल्या कार्यक्रमात गृह आधार अंतर्गत लाभार्थ्यांना मंजुरी आदेशांचे वितरण करण्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महिला व बालविकासमंत्री विश्वजित राणे, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, मडगावचे आमदार दिगंबर कामत, नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा, कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर तसेच महिला व बालविकास मंडळाच्या संचालक श्रीमती संगीता परब आणि उपसंचालक श्रीमती ज्योती देसाई उपस्थित होत्या. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, महिला व बालविकासमंत्री विश्वजीत राणे यांच्या हस्ते दक्षिण गोव्यातील 3000 लाभार्थ्यांना गृह आधार योजनेच्या मंजुरी आदेशांचे वाटप करण्यात आले.
नव्या 11, 500 जणांना गृहआधार
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे बोलताना म्हणाले की, रवींद्र भवन, मडगाव आणि सांखळी येथील रवींद्र भवन येथे झालेल्या कार्यक्रमात सुमारे 11,500 अतिरिक्त लाभार्थी जोडल्यानंतर गृहआधार योजनेच्या महिला लाभार्थ्यांची संख्या आता दीड लाखावर पोहोचली आहे. गृहआधार आणि दयानंद सामाजिक सुरक्षा या योजनांचा लाभ 3 लाखांहून अधिक जणांना मिळत असून या सर्वांना ऑगस्ट 2023 पर्यंत लाभ मिळाला आहे. दारिद्र्यारेषेखालील श्रेणीसाठी गॅस सिलिंडरच्या दरात ऊ. 200 आणि अतिरिक्त ऊ. 200 ने कपात केली आहे.
टीका करणाऱ्यांची पर्वा नाही
सरकारच्या योजनांचा लाभ मिळत नसल्याची टीका करणारे अनेकजण आहेत. काही जण तोंड असल्यामुळे फुकटचे सल्ले देतात. मात्र, आपल्याला लोकांची काळजी आहे. त्यामुळे कुणी कितीही टीका केली तरी लोकांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहे. या योजनांमुळेच अनेकांचे संसार चालण्यास मदत होत असते. त्यामुळे टीका करणाऱ्यांची आपल्याला पर्वा नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
गृह आधाराची रक्कम वाढवणार
पुढील वषी गृहआधार योजनेची रक्कम वाढवली जाईल. गोवा राज्य स्वयंपूर्ण करण्यासाठी पंचायत स्तरावर अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘वोकल फॉर लोकल’ संकल्पनेला चालना देणारा ई-बाजार डॉट कॉम हा एक उपक्रम आहे. या उपक्रमाअंतर्गत चतुर्थीचा बाजार ई-बाजार शी जोडण्यात आला असून गृहिणीना खाद्यपदार्थ, हस्तकला आणि इतर घरगुती वस्तूंच्या विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यासाठी ‘स्विगी’कडे समन्वय करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांना आपल्या वस्तू घरपोच मिळणार आहेत.
निधी वाटप करताना अनेक आव्हाने
महिला व बालविकासमंत्री विश्वजित राणे म्हणाले की, गृहिणींना गृहआधार योजनेचा लाभ मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठ पुरावा करण्यात आला व मुख्यमंत्र्यांनी त्याला मंजुरी दिली. योजनेसाठी निधी वाटप करताना अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. मात्र, सरकारने योजना बंद पडू दिलेल्या नाहीत. राज्यातील प्रत्येक घटकाला सरकारकडून लाभ मिळतो. गोवा हे इतर राज्यांसाठी मॉडेल राज्य असल्याचे सांगून गोव्याने शिक्षण, आरोग्य आणि इतर सर्व क्षेत्रात भरीव प्रगती केल्याचे नमूद केले. संचालिका श्रीमती संगीता परब यांनी स्वागत केले. सिद्धी शेलार यांनी स्वागतगीत तर सिद्धी उपाध्ये यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. उपसंचालक श्रीमती ज्योती देसाई यांनी आभार मानले.









