प्रथमच 8 टक्के मिश्रणाची आकडेवारी
कोल्हापूर /संतोष पाटील
तेल विपणन कंपन्यांनी मागील वर्षभरात 302.3 कोटी लिटर इथेनॉलचे पेट्रोलमध्ये मिश्रण केले आहे. 8.1 टक्के मिश्रणाची टक्केवारी नोंदवली आहे. इथेनॉल उत्पादन आणि पुरवठा क्षमतेने 300 कोटी लिटरचा टप्पा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ आहे. 31 जानेवारी अखेर 380 कोटी लिटर्स इथेनॉलपुरवठय़ाचे करार ?ाईल कंपन्यांनी केले आहेत. 30 लाख टन साखर उत्पादन कमी 34 लाख टन साखर कमी होईल, असा अंदाज आहे.
इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA) च्या अहवाला नुसार 2021-22 गळीत हंगामात देशात 314.50 लाख टन साखरेचे उत्पादन होईल असा अंदाज केला आहे. मागील गळीत हंगामात 82 लाख टन साखर शिल्लक आहे. देशात 396 लाख टन साखर उपलब्ध असणार आहे. यातील देशांतर्गत वापर 270 लाख टन आणि निर्यात सुमारे 60 लाख टन इतकी होईल. तरीही पुढील वर्षासाठी सुमारे 66.50 लाख टन साखर शिल्लक राहणार असल्याचे साखर उद्योगाचे अभ्यासक विजय औताडे यांनी सांगितले.
इथेनॉलच्या उत्पादनासाठी अंदाजे 34 लाख टन साखर जाईल. तरीही देशात सुमारे 30 लाख टन साखर शिल्लक राहणार आहे. मागील सलग दोन वर्षे 100 लाख टन साखर शिल्लक होती. इथेनॉलचे पेट्रोलमध्ये मिश्रणाची गती वाढवली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत पुढील वर्षी कमी साखर शिल्लक राहिल. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या साखरेचे भाव कमी झाल्यास कारखान्यांपुढील अडचणी वाढू शकतात. अतिरिक्त साखर इथेनॉल निर्मितीकडे वळवणे हाच एकमेव उपाय असल्याचे उद्योगातील तज्ञ पी. जी. मेढे सांगतात.
साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीकडे प्रोत्साहीत करण्यासाठी बी हेवी, सी हेवी आणि रसापासून बनणाया इथेनॉलसाठी प्रतिलिटर एक ते साडेतीन रुपयांची वाढ ऑक्टोबर 2020 मध्ये केली होती. केंद्र सरकारने 2018 ते 2022 पर्यंत 10 टक्के तर 2030 पर्यंत 20 टक्के इथेनॉलपेट्रोलमध्ये मिश्रित करण्याचे उदिष्ट ठेवले आहे. कोल्हापुरात 12 इथेनॉल प्रकल्पांची वार्षीक पाच कोटी लिटर उत्पादन क्षमात आहे. ही क्षमता दुप्पट होऊ शकते. राज्यात 20-21 गळीत हंगामात 117 इथेनॉल प्रकल्पातून 164 कोटी 11 लाख तर 2021 -2022 हंगामात 145 प्रकल्पातून 202 कोटी 71 लाख लिटर इथेनॉलची निर्मिती होईल.
सध्या देशात सर्व प्रकारच्या 685 कोटी लिटर इथेनॉल निर्मितीची क्षमता आहे. 10 टक्के इथेनॉल मिश्रणाचे धोरणानुसार 405 कोटी लिटर इथेनॉल निर्मिती करावी लागेल. आतापर्यंत 380 कोटी लिटर इथेनॉल खरेदीचे करार तेल कंपन्यांनी केले आहेत. यामध्ये उत्तर प्रदेश 120, महाराष्ट्र 109 तर कर्नाटक राज्याचा 59 कोटी लिटर इथेनॉल खरेदीचे करार केले आहेत.
राज्याला दिलासा
राज्यातील उत्पादीत साखरेपैकी 15 लाख टन साखर कमी इथेनॉलमुळे कमी होईल. कोल्हापूर जिह्यातील 18 ते 20 लाख मेटन साखर उत्पादीत होण्याचा अंदाज आहे. यातील सुमारे तीन लाख टन अतिरिक्त साखर इथेनॉलमुळे कमी होण्यास मदत होणार आहे.
इथेनॉल दृष्टीक्षेप
देशातील वार्षीक इथेनॉलची गरज 405 कोटी लिटर
महाराष्ट्रात 60 ते 65 कोटी लिटर गरज
राज्याची उत्पादन क्षमता 130 कोटी लिटर
देशाची उत्पादन क्षमता 685 कोटी लिटर