प्रतिनिधी/ बेळगाव
पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील दादबानहट्टी क्रॉसवर (यमकनमर्डी, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) रविवारी डीसीआयबी व यमकनमर्डी पोलिसांनी 300 किलो चांदीच्या विटा व दागिने जप्त केले आहे. डस्टर कारमधून हुपरीहून (जि. कोल्हापूर) तामिळनाडूतील सेलमला हा साठा नेण्यात येत होता. जप्त चंदीची किंमत 63 लाख इतकी होते.
बेळगाव जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी रविवारी रात्री ही माहिती दिली आहे. डीसीआयबी व यमकनमर्डी पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली असून या कारवाईचे पोलीस प्रमुखांनी कौतुक केले आहे. अटक करण्यात आलेल्या दोघा जणांवर यमकनमर्डी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आले आहे.
विजयकुमार आत्माराम शिंदे (वय 48 रा. सवापेठ, सेलम तामिळनाडू), रियाज झाकीरहुसेन मुलतानी (वय 20 रा. बेळेवाडी ता. खटाव जि. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याजवळून 63 लाख रुपये किमतीचे तीन क्विंटल चांदी, तीन लाख रुपये रोख रक्कम व 9 लाख रुपये किमतीची केएच 03 एलसी 2616 क्रमांकाची डस्टर कार जप्त करण्यात आली आहे.
डीसीआयबीचे पोलीस निरीक्षक निंगनगौडा पाटील, हुक्केरीचे पोलीस निरीक्षक गुरुराज कल्याणशेट्टी, यमकनमर्डीचे पोलीस उपनिरीक्षक रमेश बी. पाटील, डीसीआयबीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डी. के. पाटील, टी. के. कोळची, एम. जी. मुजावर, एस. एम. मंगणावर, एम. आय. पठाण, व्ही. आर. नायक, आर. बी. कल्लोळ्ळी आदींनी रविवारी सकाळी पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली आहे.
हुपरीहून सेलमला चांदीच्या विटा व इतर दागिन्यांची बेकायदा वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी दादबानहट्टी क्रॉसवर वाहनांची तपासणी सुरू केली. डस्टर कार अडवून तपासणी केली असता त्यामध्ये 300 किलो इतके चांदी व तीन लाख रुपये रोकड आढळून आली. दोघा जणांना अटक करून चांदी जप्त करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.









