2 सरकारी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप
गुवाहाटी : आसाममध्ये एका 30 वर्षीय असिस्टंट इंजिनियर असलेल्या महिलेने भाड्याने राहत असलेल्या घरात आत्महत्या केली आहे. बोंगाईगावमध्ये महिला इंजिनियर मृत आढळून आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना अटक केली आहे. महिलेने सुसाइड नोटमध्ये दोन सरकारी अधिकारी बनावट बिल मंजूर करण्यासाठी दबाव आणत होते, असे लिहिले होते. दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अर्धवट कामांच्या बिलांना मंजूर करण्यासाठी माझ्यावर सातत्याने दबाव टाकला जात होता, असा आरोप महिलेने सुसाइड नोटमध्ये केला आहे. सुसाइड नोटमध्ये उल्लेख असलेल्या दोन्ही अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. यातील एक सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता असून दुसरा उप-मंडल अधिकारी असल्याची माहिती बोंगाईगावचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोहनलाल मीणा यांनी दिली आहे. दोन्ही अधिकारी बोंगाईगाव येथे एका मिनी स्टेडियमच्या निर्मितीकार्यावरून महिला इंंजिनियरवर दबाव टाकत होते, असे समोर आले आहे. प्रकल्पाच्या ठेकेदाराने वाढवून दाखविलेल्या बिल्सना मंजूर करण्यासाठी महिला इंजिनियरचा मानसिक छळ केला जात होता.









