पंतप्रधान कार्यालयातून गोवा मुख्य सचिवांकडे तक्रार : राज्याच्या सीमांवर दक्षता राखण्याचे निर्देश, मनेका गांधी यांनी दिली होती तक्रार
पणजी : कर्नाटकातून गोव्यात प्रतिदिन 30 टन मांसाची तस्कारी होत असल्याची तक्रार पंतप्रधान कार्यालयातून थेट गोवा मुख्य सचिवांपर्यंत पोहोचल्यानंतर पशुसंवर्धन खाते खडबडून जागे झाले आहे. गोव्याच्या सीमांवर दक्षता राखण्याचे निर्देश खात्यातर्फे अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसे परिपत्रकही जारी करण्यात आले आहे. मुळात ती तक्रार मनेका संजय गांधी यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे दिले होती. ती पुढील कार्यवाहीसाठी गोव्याकडे पाठविण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
बेकायदेशीर आढळल्यास वाहनांसह मांस जप्त करा!
गोव्यात येणाऱ्या मांसाची सीमेवर बसून चौकशी करण्यात यावी, तसेच ते मांस विक्रेत्यांकडे दुकानापर्यंत कसे पोहोचते आणि त्यांची कागदपत्रे योग्य आहेत की नाहीत याची तपासणी करावी. त्यात काही संशयास्पद आढळले तर तपास करून खरेखाट्याचा सोक्षमोक्ष लावावा आणि बेकायदेशीर असल्याचे दिसल्यास वाहनांसह मांस जप्तीची कारवाई करावी, असे परिपत्रकातून बजावण्यात आले आहे. पोलिसांची मदत घेऊन वाहनांची तपासणी सीमा चेकनाक्यावर झाली पाहिजे. या प्रकरणात पशुसंवर्धन खात्याची कार्यवाही मर्यादित असून सर्व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी जागृत रहावे व मांसाची तस्करी होणार नाही याची खात्री करावी. गोव्यात येणारी गुरे ही नोंदणीकृत पुरवठादाराकडून येतात की नाही याची कागदपत्रांसह तपासणी करण्याची गरज खात्यातर्फे परिपत्रकातून वर्तविण्यात आली आहे.
इतर राज्यातून मांस आण्याची गरज नाही!
गोव्यातील मांसाची मागणी पूर्ण करण्यासाठी गोवा मांस प्रकल्प आणि तेथे होणारी कत्तल पुरेशी आहे. गोव्यासाठी इतर राज्यातून मांस आणण्याची गरज भासत नाही. फक्त जनावरे आणावी लागतात. योग्य ते निकष लावून ती आणली जावीत, असे पशुसंर्वधन खात्यातील सूत्रांनी सांगितले. मांसाची तस्करी रोखण्यासाठी खाते व सरकार प्रयत्नशील असून लोकांनीदेखील जागृत राहून खात्याला कळवावे व सावध करावे, आवाहन करण्यात आले आहे.








