अपार्टमेंट आहे का पूर्ण जिल्हा?
जगात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या लोकांचे लक्ष वेधून घेतात. अनेक अशा इमारती निर्माण करण्यात आल्या आहेत, ज्या स्वत:च्या आकर्षक डिझाइनमुळे चर्चेत आहेत. चीन तर अजब निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. चीनमधील अनेक गोष्टी लोकांना आश्चर्यचकित करत असतात. चीनमध्ये 10 वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या एका इमारतीत सध्या एकूण 30 हजार लोक राहत आहेत. या इमारतीत इतके लोक राहत असूनही यातील सुविधा प्रत्येकाला अचंबित करत आहे.
चीनच्या किअंजियांग सेंच्युरी सिटी, हांग्झोऊमध्ये तयार द रिजेंट इंटरनॅशनल अपार्टमेंट अजब कारणामुळे चर्चेत असते. एस पॅटर्नमध्ये तयार या इमारतीत एकूण 30 हजार लोक राहतात. इतक्या लोकसंख्येतून एक छोटे शहरच तेथे तयार झाले आहे. या 36 मजली इमारतीला 2013 मध्ये खुले करण्यात आले होते. त्यावेळी या इमारतीत 20 हजार लोक राहत होते. आता 10 वर्षांनी यात राहणाऱ्या लोकांची संख्या 30 हजारांवर पोहोचली आहे.
कधीकाळी होते हॉटेल
हे अपार्टमेंट कधीकाळी हॉटेल होते. परंतु आता याला अपार्टमेंटमध्ये रुपांतरित करण्यात आले आहे. ही इमारत 206 मीटर उंचीची असून यात 36 मजले आहेत. यात अनेक प्रकारच्या सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. या इमारतीत एक मोठे फूड कोर्ट देखील आहे. तसेच स्वीमिंग पूल, सलून, नेल सलून, सुपरमार्केट आणि इंटरनेट कॅफे देखील आहे. या इमारतीत राहणाऱ्या लोकांना कुठल्याही गोष्टीसाठी बाहेर जावे लागत नाही. सर्व सुविधा याच इमारतीत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
लोकांकडून आश्चर्य व्यक्त
या इमारतीशी निगडित एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. या इमारतीला एक जिल्हा का घोषित करत नाहीत अशी विचारणा एका युजरने केली आहे. या इमारतीत प्रामुख्याने तरुण लोकांचे वास्तव्य आहे. तसेच छोट्या व्यावसायिकांचे हे वास्तव्यस्थान आहे.









