विदेशी कंपन्यांचा ओढा आता ईव्हीकडे
नवी दिल्ली
पेट्रोल-डिझेल कारमध्ये फारसे यश न मिळालेल्या विदेशी कंपन्यांना भारतातील तेजीत असलेल्या इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) बाजारपेठेत संधी उपलब्ध होत आहे. अशा कंपन्यांसाठी मारुती सुझुकी, महिंद्रा अँड महिंद्रा आणि टाटा मोटर्स सारख्या स्थानिक कंपन्यांची बाजारपेठेतील मजबूत पकड कमी करणे कठीण झाले आहे, परंतु त्यांना ईव्ही सेगमेंटमध्ये मोठी संधी निर्माण होत असल्याचे दिसत आहे. ही संधी साधून विदेशी कार कंपन्या भारतात 30,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.
एमजी मोटर्स, रेनॉ, निस्सान आणि फोक्सवॅगन यासारख्या कंपन्या पेट्रोलियम कारचा विस्तार कमी करून भारतात ईव्हीएसवर लक्ष केंद्रित करत आहेत. जागतिक कंपन्यांनी यापूर्वी देशातील लक्झरी ईव्ही बाजारात अनेक कार्स लाँच केल्या आहेत. यामध्ये व्होल्वो कार, ऑडी, जेएलआर आणि स्टेलांटिस यांचा समावेश राहिला आहे.
पाच विदेशी कंपन्यांचे भारतीय ईव्ही मार्केटवर लक्ष केंद्रित
एमजी मोटर
चीनी कंपनी एसएआयसीची ब्रिटीश ब्रँड एमजी मोर्ट्स भारतात सध्याच्या दोन ईव्ही व्यतिरिक्त 4-5 नवीन इलेक्ट्रिक मॉडेल्स लाँच करणार आहे. कंपनी भारतात 5,000 कोटींच्या गुंतवणुकीने दुसरा कारखाना उभारणार आहे. याशिवाय बॅटरी असेंबलिंग प्रकल्पही उभारला जाणार आहे
ह्युंडाई मोटर
ह्युंडाई मोटर इंडिया 20 हजार कोटींच्या गुंतवणुकीसह भारतात ईव्ही प्रकल्प राबवणार आहे. कंपनी 2032 पर्यंत 1.78 लाख युनिट्सची वार्षिक क्षमता असलेली फॅक्टरी स्थापन करणार आहे. याशिवाय, विद्यमान 4 ईव्ही व्यतिरिक्त अनेक नवीन इलेक्ट्रिक कार मॉडेल लॉन्च करणार असल्याची माहिती आहे.
फोक्सवॅगन
जर्मन कंपनीने या दशकाच्या अखेरीस 30 टक्के प्रवासी कार्स इलेक्ट्रिकवर आधारीत बनवण्याची योजना आखली आहे. फोक्सवॅगनची पहिली इलेक्ट्रिक कार आयडी 4 पुढील वर्षी भारतीय बाजारात दाखल होऊ शकते. आगामी काळात इतर मॉडेल्सही येतील.
रेनॉ-निस्सान
पेट्रोल कार भारतात फारशा यशस्वी न झाल्याने ही कंपनी ईव्ही वाहने विकसित करणार आहे. 5,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करून उत्पादन सुविधेचा विस्तार करेल. येत्या काही वर्षांत 2 नवीन इलेक्ट्रिक मॉडेल्स लॉन्च करण्याची योजना आहे.
प्रगत तंत्रज्ञानाची चमक
गेल्या 7-8 वर्षांत देशातील ऑटोमोबाईल क्षेत्राने मोठ्या प्रमाणावर प्रगत तंत्रज्ञान विकसित केले आहे. यामध्ये इंटरनेट ऑफ थिंग्ज, इलेक्ट्रिक ऑटोमेटेड आणि कनेक्टेड व्हेईकल, अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टंट सिस्टीम आणि सॉफ्टवेअर ड्रिव्हन व्हेईकल यांचा समावेश आहे. जगभरातील कंपन्या भारतात आपले प्लांट उभारत आहेत.
भारत ईव्ही केंद्र बनण्याच्या मार्गावर : सिंघानिया
एफएडीएचे अध्यक्ष मनीष राज सिंघानिया (इंडिया) म्हणाले, की भारत जगातील आघाडीवरच्या ऑटोमोबाईल बाजारपेठेपैकी एक असून आता ईव्हीचे प्रमुख केंद्र बनत आहे. ही फक्त सुरुवात आहे, परंतु राजस्थान आणि काश्मीरमध्ये सापडलेल्या लिथियमच्या खाणी आणि प्रक्रिया सुरू झाल्यास, आणखी परदेशी कंपन्या भारतात ईव्ही प्लांट्स घालणार असल्याचेही सिंघानिया यावेळी म्हणाले आहेत.









