लखनौ / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशातील बदायूं येथे सध्या एक अनोखे हत्याप्रकरण गाजत आहे. एका व्यक्तीवर एका प्राणीसंरक्षकाने उंदराची हत्या केल्याचा आरोप केला असून त्याची चौकशी सुरु आहे. या आरोपविरोधात 30 पानी आरोपपत्र सादर झाले आहे. हे जगातील अशा प्रकारचे पहिलेच प्रकरण असावे, असे मानले जात आहे.
आरोपीचे नाव मनोज असे असून त्याच्या विरोधात तक्रार सादर करणाऱया प्राणीप्रेमीचे नाव विकेंद्र असे आहे. 25 नोव्हेंबर 2022 या दिवशी मनोज याने त्याच्या घरात शिरलेला उंदीर क्रूरपणे मारला असा त्याच्यावर आरोप आहे. त्याने या उदंराच्या शेपटीला दगड बांधला आणि त्याला नाल्यात फेकले. त्याने हे कृत्य करत असताना त्याला या प्राणीप्रेमीने पाहिले. त्याने मनोजला रोखण्याचा प्रयत्न केला. मनोज तेथून गेल्यावर विकेंद्र याने या उंदराला बाहेर काढले आणि त्याचा व्हिडीओ तयार केला. त्या आधारावर तक्रार सादर करण्यात आली आहे.
पोलिसांनी आरोपीला बोलावून घेऊन त्याची चौकशी करुन सोडून दिले. मात्र तोपर्यंत विकेंद्र याने मेलेला उंदीर शवविच्छेदनासाठी पाठविल्याने पोलिसांना पुढील कारवाई करणे भाग पडले. आता हे प्रकरण न्यायालयासमोर असून आरोपी मनोज विरोधात आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. शवविच्छेदनाचा सर्व खर्च विकेंद याने केला आहे. शवविच्छेदनात उंदराच्या फुप्फुसांना सूज आणि जंतूसंसर्ग झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.
गुन्हा केलेला नाही
उंदीर मारणे हा गुन्हा नाही. त्यामुळे मी कोणताही गुन्हा केलेला नाही. जरी तो गुन्हा असेल तरी त्यासाठीं मी क्षमायाचनाही केलेली आहे. त्यामुळे माझ्याविरोधात कोणतेही प्रकरण बनत नाही. जे लोक कोंबडय़ा आणि बोकड किंवा शेळय़ा-मेंढय़ा मारतात त्यांच्या विरोधातही अशा प्रकारचे हत्येचे गुन्हा सादर होणार आहेत का, असा प्रश्न आरोपी मनोज याने विचारला आहे. या उंदराने माझ्या घरात हानी केली आहे, असाही दावा आरोपीने केला. एकंदर, हे प्रकरण गाजत आहे.









