कारवाईत एक सुरक्षा कर्मचाऱ्याचाही मृत्यू, दोन जिल्ह्यांमध्ये राज्य प्रशासनाची धडक कारवाई
वृत्तसंस्था/रायपूर
छत्तीसगडमध्ये नक्षलींच्या विरोधात मोठे अभियान हाती घेण्यात आले आहे. त्याअंतर्गत गुरुवारी झालेल्या धडक कारवाईत राज्याच्या बीजापूर आणि कांकेर जिल्ह्यांमध्ये 30 नक्षलींचा खात्मा करण्यात आला. नक्षलींशी दोन हात करताना एक सुरक्षा सैनिकाचाही मृत्यू ओढवला. ही कारवाई साधारणत: चार तासांची होती. मृत्यू झालेला सुरक्षा सैनिक बीजापूर जिल्हा राखीव गार्डचा आहे. गुरुवारी सकाळपासूनच या सुरक्षा दलाच्या कारवाईला प्रारंभ करण्यात आला होता. गस्त घालत असलेल्या सुरक्षा सैनिकांवर नक्षलींनी गोळीबार केला. प्रत्युत्तरात सैनिकांनी केलेल्या गोळीबारात हे नक्षलवादी ठार झाले. हिडमा नामक नक्षलवाद्याचा शोध घेण्यासाठी ही गस्त घालण्यात येत होती. या नक्षवलाद्याचा शोध या परिसरातील 120 गावांमध्ये घेतला जात होता. 26 नक्षलवादी बीजापूर जिल्ह्यात तर उरलेले 4 कांकेर जिल्ह्यात मारण्यात आले आहेत. इतक्या मोठ्या संख्येने एका चकमकीत नक्षलवादी ठार होण्याची ही गेल्या सहा महिन्यांमधील दुसरी वेळ आहे. बीजापूर जिल्हा नक्षलवाद्यांचे केंद्र म्हणून ओळखला जातो.
अमित शहा यांच्याकडून अभिनंदन
पुढच्या वर्षीच्या 31 मार्चपर्यंत देश नक्षलमुक्त करणार, अशी घोषणा केंद्र सरकारने केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी नक्षलींविरोधात करण्यात आलेल्या कारवाईचे समर्थन करताना, राज्य प्रशासनाचे अभिनंदन केले आहे. नक्षली हे निर्दय असल्याने त्यांच्याविरोधात अशी कारवाई समर्थनीय ठरते, अशी प्रतिक्रिया अमित शहा यांनी व्यक्त केली. नक्षलवादाचा खात्मा करणे हे सरकारचे कर्तव्यच असून ते आम्ही करीत आहोत, असे प्रतिपादन त्यांनी केले.
डबल इंजिन सरकारचा प्रभाव
राज्यातून नक्षलवाद संपविण्याचा निर्धार छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णूदेव साय यांनी व्यक्त केला. त्यांनीही नक्षलविरोधी दलांचे कौतुक करताना, ही डबल इंजिन सरकारची कारवाई असल्याचा उल्लेख आवर्जून केला. 31 मार्च 2026 पूर्वी राज्यातून नक्षलवाद संपविला जाईल, हा निर्धार त्यांनी यावेळी बोलून दाखविला. निर्दय आणि अत्याचारी नक्षलींचा अंत निश्चित असून राज्य सरकार निर्धारित वेळेपूर्वीच हे अभियान पूर्ण करणार आहे, असा विश्वास त्यांनी बोलून दाखविला.
हौतात्म्य व्यर्थ नाही जाणार
या कारवाईत एक सुरक्षा सैनिक मृत्यूमुखी पडला असून त्याचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. आमचे सरकार डिसेंबर 2023 मध्ये निवडून आल्यापासून आम्ही नक्षलींविरोधात धडक कारवाई करीत आहोत. आमच्या प्रयत्नांना यश येत आहे. योग्य नियोजन करुन ही कारवाई केली जात आहे. आम्हाला स्थानिक जनतेचेही सहकार्य मिळत आहे. नक्षलवाद्यांनी आता स्थानिक जनतेलाच पिळण्याचे काम चालविले आहे. त्यामुळे जनतेला प्रशासनासंबंधी सहानुभूती आहे. आम्ही जनतेला विश्वासात घेऊनच ही कारवाई हाती घेतली. ही कारवाई दुर्गम भागात करावी लागत असल्याने ती आव्हानात्मक आहे. तथापि, आमचे कर्तव्यदक्ष सुरक्षा सैनिक ही आव्हाने स्वीकारण्यास सक्षम असून त्यांनी हे सिद्ध केले आहे, असेही प्रतिपादन मुख्यमंत्री विष्णूदेव साय यांनी केले. गेल्या सहा महिन्यांमध्ये नक्षलींविरोधात केलेल्या कारवायांचा त्यांनी या निमित्त आढावा घेतला.
पोलीस स्थानकाचा विशेष गौरव
या कारवाईत मोलाची कामगिरी केलेल्या गंगालूर पोलिस स्थानकाचा विशेष उल्लेख छत्तीसगडच्या विधानसभेचे अध्यक्ष आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री रमणसिंग यांनी केला. या स्थानकाच्या पोलिसांनी स्पृहणीय कामगिरी केली असून आपल्या कार्यकक्षेत 20 नक्षलेचा खात्मा केला असल्याची माहिती त्यांनी दिली.









