महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय : संबंधित प्रभागातील समस्या मार्गी लागणार
बेळगाव : शहरातील विविध प्रभागांच्या समस्या सोडविण्यासाठी महानगरपालिकेतील सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीच्या बैठकीत काही प्रभागांना प्रत्येकी 30 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. सत्ताधारी आणि विरोधी गटाच्या नगरसेवकांनी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता संबंधित प्रभागातील समस्या मार्गी लागण्याची शक्यता आहे. शहरातील प्रभाग क्रमांक 4, 6, 7, 17, 26, 31, 32, 33, 34, 35, 36, 45, 46 आणि 55 या प्रभागांना हा निधी देण्यात येणार आहे. या सर्व प्रभागांमध्ये ड्रेनेज, गटारी, रस्ते आणि इतर समस्या भेडसावत आहेत. त्यामुळे या प्रभागांना हा निधी देण्याबाबत सोमवारी झालेल्या सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्थायी समितीच्या चेअरमन वाणी जोशी होत्या. यावेळी विविध विषयांवर सत्ताधारी गटनेते राजशेखर डोणी आणि विरोधी गटनेते मुज्जम्मील डोणी यांनी चर्चा केली. प्रारंभी उपायुक्त आणि प्रभारी कौन्सिल सेक्रेटरी उदयकुमार तळवार यांनी स्थायी समितीच्या बैठकीबाबतची माहिती दिली. विरोधी गटनेते मुज्जम्मील डोणी यांनी स्थायी समितीच्या बैठकीत किती लाखापर्यंतचा निधी मंजूर करता येतो, याची माहिती मागितली. त्यावर कायदा सल्लागार अॅड. महांतशेट्टी यांनी एका कामासाठी 1 कोटीपेक्षा कमी रुपयांचा निधी मंजूर करू शकतो, अशी माहिती दिली. त्यानंतर बैठकीला सुरुवात झाली. वरील सर्व प्रभागांना 30 लाखांपर्यंत निधी मंजूर करण्यात आला आहे.
मागील बैठकीत झाला होता विरोध
काही प्रभागांनाच हा निधी दिला जात असल्यामुळे मागील बैठकीत काही नगरसेवकांनी जोरदार आक्षेप घेतला होता. त्यामुळे हा ठराव मंजूर करण्यात आला नव्हता. सोमवारी झालेल्या बैठकीत मात्र सविस्तर चर्चा करून मंजुरी देण्यात आली आहे.
बंद पथदीपांवर जोरदार चर्चा
शहरामध्ये अनेक ठिकाणी पथदीपच नाहीत. त्याठिकाणी विद्युतखांबांचीही गरज आहे. त्यामुळे तातडीने याबाबत बैठकीत निर्णय घेण्याची मागणी नगरसेवकांनी केली. त्यावर हेस्कॉम आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे पाहणी करून चर्चा केली आहे. त्यामुळे लवकरच ही समस्या दूर करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
अतिक्रमणाबाबत अधिकाऱ्यांचे मौन
विरोधी गटनेते मुज्जम्मील डोणी यांनी शहरामध्ये महानगरपालिकेच्या जागांवर अतिक्रमण वाढत चालले आहे. मात्र त्याकडे अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष झाले आहे. खंजर गल्ली येथे रस्त्यावरच अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यावर कारवाई करणे गरजेचे होते. मात्र अधिकारी अशा अतिक्रमणांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. आम्ही सांगितल्यानंतर काही ठिकाणी अधिकारी अतिक्रमण हटविण्यासाठी प्रयत्न करतात. त्यावेळी नगरसेवकाने तक्रार केली म्हणून आम्ही अतिक्रमण हटवत आहे, असे ते संबंधित जागा मालकाला सांगतात. त्यामुळे आम्हालाच अधिक दोष दिला जात आहे. वास्तविक महानगरपालिकेच्या जागांवर अतिक्रमण झाले तर अधिकाऱ्यांनीच ते हटविले पाहिजे, असे त्यांनी बैठकीत सांगितले. या बैठकीला नगरसेवक शहीदखान पठाण, शंकर पाटील, वीणा विजापुरे, हणमंत कोंगाली, रवी धोत्रे यांच्यासह इतर नगरसेवक उपस्थित होते.









