मंगळूरहून बेळगावला येत होता साठा, दोघा ट्रक चालकांवर संशय, हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात एफआयआर
प्रतिनिधी/ बेळगाव
पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील हिरेबागेवाडीजवळील बडेकोळमठ क्रॉसजवळ सुमारे 30 लाख रुपयांहून अधिक किंमतीचे खाद्य तेल पळविण्यात आले आहे. मंगळूरहून बेळगावकडे येणारी ट्रक लुटल्याची घटना घडली असून या घटनेने एकच खळबळ माजली आहे.
शुक्रवार दि. 17 फेब्रुवारी रोजी ही घटना उघडकीस आली आहे. शनिवारी लाडसाल-उडपी येथील ट्रक मालक इस्माईल नवाल यांनी हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून त्याच्या ट्रकवर काम करणाऱ्या दोघा चालकांनी हे कृत्य केल्याचा संशय आहे. सर्वत्र त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
केए 20 एए 6062 क्रमांकाच्या ट्रकमधून सुमारे 30 लाख 38 हजार रुपये किमंतीचे खाद्य तेल बेळगावला पाठविण्यात येत होते. 15 फेब्रुवारी रोजी हा ट्रक मंगळूरहून बेळगावकडे निघाला. खरे तर दुसऱ्या दिवशी 16 फेब्रुवारीला बेळगावला पोहोचायला हवे होते. सायंकाळपर्यंत ट्रक पोहोचला नाही. चालकांचे मोबाईलही स्वीचऑफ होते.
ट्रक मालकाने बेळगाव येथे ज्या घाऊक व्यापाऱ्याकडे तेल पोहोचवायचे होते त्यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली. गुरूवारी 16 फेब्रुवारी रोजी हा ट्रक हिरेबागेवाडी टोलनाका ओलांडला होता. तर बेळगावला कसे पोहोचले नाही? असा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे ट्रक मालक इस्माईल स्वत: मंगळूरहून बेळगावाला आले.
महामार्गावर कोठे तरी आपली ट्रक उभी आहे का? हे पाहत असतानाच बडेकोळमठ क्रॉसजवळील घाटात ट्रक उभी होती. त्यामधील खाद्य तेल चोरीस गेल्याचे आढळून आले. त्यामुळे शनिवारी हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला असून चोरीस गेलेल्या तेलाचा साठा शोधण्यासाठी दोन पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाली आहेत.
ट्रक चालकांचा मोबाईल स्वीचऑफ
मंगळूरहून बेळगावकडे निघालेल्या ट्रकमध्ये इब्राहिम अली व साहेबअली असे दोन चालक होते. ते दोघेही मुळचे आसामचे. त्यांचे फोन स्वीचऑफ झाले आहेत. बडेकोळमठाजवळील घाटात खाद्य तेलाने भरलेली ट्रक उभी करुन दुसऱ्या ट्रकमध्ये तेलाचे बॉक्स भरल्याचा संशय आहे. हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक अंबरीश पुढील तपास करीत आहेत.









