हमीदाराचीही फसवणुक, वास्कोतील युवकाला अटक
प्रतिनिधी /वास्को
कर्जासाठी बनावट दस्तऐवज सादर करून वास्कोतील एका बँकेला सुमारे 30 लाखांना फसवल्या प्रकरणी वास्कोतील युवक सनिल शशिकांत देसाई याला पोलिसांनी अटक केली आहे. आणखी एका बँकेची अशीच फसवणुक करताना त्याने हमीदारालाही फसवल्याचे उघडकीस आलेले असून त्याला या प्रकरणातही अटक करण्यात आलेली आहे. त्याला चार दिवसांच्या रिमांडवर पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
वास्को पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार फेब्रुवारी 2021 मध्ये वास्कोतील एका सहकारी बँकेच्या व्यवस्थापकाला आपल्या बँकेची फसवणुक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी वास्को पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार उदय विश्वनाथ देसाई व सानिल देसाई या दोघांनी दाबोळी येथील दोन फ्लॅटच्या आधारे कर्ज उचलण्यासाठी बँकेची फसवणुक करण्याचे षडयंत्र रचले होते. ते फ्लॅट गहाण ठेवण्याचे नाटक करण्यात आले होते. हे कर्ज उदय देसाई याच्या नावावर घेण्यात आले होते. 29 लाख 48 हजारांचे कर्ज बँकेने मंजूर केले होते. मात्र, हे कर्ज घेण्यासाठी त्या दोघांनी बनावट विक्री करार पत्र तयार केले व ते बँकेला सादर केले. बँकेचे कर्ज थकल्यानंतरच हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे बँक व्यवस्थापकांनी पोलीस तक्रार केली होती. पोलीस मागच्या एक वर्षांहून अधिक काळ सनिल देसाई या युवकाच्या मागावर होते. मात्र तो पोलिसांना सापडत नव्हता. शेवटी सोमवारी संध्याकाळी मडगावात त्याला ताब्यात घेण्यास पोलिसांना यश आले. त्याला अटक करून पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक कपील नायक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रोहन नागेशकर अधिक तपास करीत आहेत.
दुसऱया बँकेतील कर्जासाठी हमीदाराचीही फसवणुक
या आर्थिक फसवणुकीशिवाय वास्कोतीलच आणखी एका सहकारी संस्थेकडून आपणच कर्ज घेत असल्याचे भासवून त्याने आपल्या हमीदारालाही फसवल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेप्रकरणी वास्कोतील एक व्यवसायीक अभिषेककुमार राय यांनी सदर सहकारी संस्थेने कर्ज वसुलीसाठी त्याच्यामागे तगादा लावल्याने सनिल देसाई याच्या विरूध्द प्रथम श्रेणी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. फसवणुकीचा हा प्रकार मार्च ते जुलै 2017 च्या दरम्यान घडला होता. तक्राराने केलेल्या दाव्यानुसार सदर सानिल देसाई याने आपण वास्कोतील एका सहकारी संस्थेकडून 25 लाखांचे कर्ज घेत असल्याचे सांगून त्याला हमीदार राहण्याची विनंती केली होती. त्यानुसार अभिषेक राय हे हमीदार राहिले होते. मात्र, कर्जासाठीच्या कागदपत्रांवर सहय़ा घेताना भलत्याच व्यक्तीच्या कागदपत्रांवर सहय़ा घेतल्या होत्या. सदर कर्ज घेणाऱया व्यक्तीचे नाव विकास वासुदेव बिचोलकर असे आहे. या व्यक्तीला कर्जासाठी सनिल यानेच पुढे केले होते. सदर व्यक्ती ईस्लामपूर बायणातील आहे. तर सनिल हा देस्तेरो बायणा भागातील राहणारा आहे. हे 25 लाखांचे कर्जसुध्दा थकल्यानंतर हमीदाराला नोटीस मिळताच हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. आपण या व्यक्तीला हमीदार राहिलोच नव्हतो. सनिल देसाई यानेच हा घोळ केल्याचा दावा हमीदाराने न्यायालयात केला व तो सिध्द झाल्याने न्यायालयाने पोलिसांना गुन्हा नोंद करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार सनिल देसाई याच्याविरूध्द या फसवणुक प्रकरणीसुध्दा गुन्हा नोंद करण्यात आला. वरील दोन्ही फसवणुक प्रकरणात गुंतलेल्या अन्य संशयीतांनाही अटक केली जाणार आहे.
आणखी फसवणुकीची प्रकरणे नोंद होण्याची शक्यता
दरम्यान, सदर सनिल देसाई हा युवक विविध आर्थिक फसवणुक प्रकरणात गुंतलेला असल्याचा संशय असून गेल्या काही वर्षांपासून त्याच्या नावाची वास्कोत बरीच चर्चा होत आहे. पुढील काही दिवसांत त्याच्याविरूध्द आणखी फसवणुकीच्या तक्रारी दाखल होण्याची शक्यता आहे. वास्को शहरातीलच दोन सहकारी वित्तीय संस्थांकडून सुमारे 55 लाखांचे कर्ज फसवणुकीव्दारे उकळण्याचा हा प्रकार व फसवणुक करणारी ही व्यक्ती सध्या चर्चेचा विषय ठरलेली असून सदर बँकांच्या व्यवहाराबाबतही संशय व्यक्त करण्यात येत आहे.









