भरदिवसा क्लासवन कॉन्ट्रक्टरच्या बंगल्यात चोरी : पंतनगर येथील घटनेने खळबळ
प्रतिनिधी / निपाणी
निपाणीत भरदिवसा क्लासवन कॉन्ट्रक्टरचा बंगला फोडून जवळपास 30 लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. चंद्रशेखर मल्लिकार्जुन जोनी असे संबंधित घरमालकाचे नाव आहे. चोरटय़ांनी 5 लाख रुपयांची रोख रक्कम आणि जवळपास 25 लाख रुपये किमतीचे 50 तोळे सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारला आहे. पंतनगर भागात भरदिवसा घडलेल्या या घटनेने निपाणीसह परिसरात पुन्हा एकदा घबराट पसरली आहे. तसेच शहरात वारंवार चोरीचे सत्र सुरू असूनदेखील पोलिसांना चोरटे सापडत नसल्याने नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की, चंद्रशेखर जोनी हे गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आपल्या कुटुंबीयांसमवेत आंबोली येथे पर्यटनासाठी गेले होते. चोरटय़ांनी हीच संधी साधून बंगल्याच्या मागील बाजूने प्रवेश करत बंगल्यातील 5 लाखांची रोकड व 50 तोळे सोने असा सुमारे 30 लाखांच्या ऐवजावर डल्ला मारून पलायन केले.
जोनी कुटुंबीय आंबोलीतून घरी परतल्यानंतर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास चोरीची घटना लक्षात आली. चोरटय़ांनी घरातील ऐवजावर डल्ला मारल्याचे निदर्शनास येताच जोनी यांनी त्वरित शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधत घटनेविषयीची माहिती दिली. त्यानंतर डीएसपी बसवराज एलीगार, सीपीआय संगमेश शिवयोगी, शहर फौजदार कृष्णवेणी गुर्लहोसुर, बसवेश्वर चौकचे फौजदार आनंदा कॅरीकट्टी व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच जोनी कुटुंबियांकडून लंपास झालेल्या ऐवजाची माहिती घेतली.









