पुणे / प्रतिनिधी :
उत्तर प्रदेश विधानसभाचे आमदार संजयकुमार पांडे यांच्या नावाचा वापर करून बनावट नोटांची टोळी कार्यरत असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील एका इसमाची सव्वापाच लाख रुपयांच्या बदल्यात 30 लाख रुपयांच्या बनावट नोटा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याबाबत गणेश सिंह इंद्रसिंग राज पुरोहित (रा. खराडी, पुणे) यांनी आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार वानवडी पोलीस ठाण्यात रुपाली राऊत (रा. पुणे), संजय कुमार पांडे (उत्तर प्रदेश), विकास कुमार रावत समीर उर्फ विशाल घोगरे (रा. निलंगा ,लातूर) आणि अशोक पाटील (रा. कोल्हापूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 30 मार्च 20 एप्रिल यादरम्यान घडलेली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपाली राऊत या आरोपीने तक्रारदार गणेश राजपूत यांना संजय कुमार पांडे हे उत्तर प्रदेशमध्ये मंत्री असल्याचे सांगितले. तसेच त्यांचा ड्रायव्हर विकास कुमार रावत यांनी भारतीय चलनातील वाटणाऱ्या नोटा समीर घोगरे आणि अशोक पाटील या आरोपींच्या संगनमताने कट रचून देण्याचे दाखवले. त्यानुसार तक्रारदार यांना वानवडीतील एसआरपीएफ ग्रुपजवळ परमारनगर याठिकाणी आरोपींनी बोलवून घेतले. सुरुवातीला त्यांना काही नोटा देण्यात आल्या. संबंधित पाच ते सहा नोटा तक्रारदार व्यवसायिक यांनी चलनात वापरल्यानंतर त्या कोणतीही शंका न येता वाटल्या गेल्याने त्यांचा विश्वास वाढला. त्यामुळे आरोपींनी त्यास पाच लाख 34 हजार रुपयांच्या बदल्यात हुबेहूब भारतीय चलनातील वाटणारे 30 लाख रुपये देण्याचे आमिष दाखवले. त्याबाबतचा केमिकलचा वापर करून हुबेहूब नोटा बनविण्याचा डेमोही आरोपींनी त्यास करून दाखवला. त्याकरिता त्यांच्या मोठय़ा ओळखी असल्याचे व त्यांच्यातील संजय कुमार पांडे हे उत्तर प्रदेश विधानसभेचे आमदार असल्याचा बनाव आरोपींनी केला व विश्वास संपादन केला. त्यानुसार तक्रारदार यांच्याकडून पाच लाख 34 हजार रुपये घेत त्याच्या तीनपट हुबेहुब भारतीय चलनातील वाटणाऱ्या 30 लाख रुपये परत देणार असल्याचे सांगितले. मात्र, संबंधित तक्रारदार यांच्या पैसे घेतल्यानंतर आरोपींनी सदर पैशांचा त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून कोणतेही पैसे परत न करता फसवणूक केली. व्यावसायिकांनी पैशाची मागणी केली असता आरोपींनी त्यांच्याकडील पिस्तूलने जिवे मारण्याची भीती घातली आहे. याबाबत वानवडी पोलीस ठाण्याचे पोलीस तपास करत आहेत.









