सर्वात जास्त अथणी तर सर्वात कमी बेळगाव उत्तर मतदारसंघात मतदान : जिल्ह्यात 76.95 टक्के मतदान
प्रतिनिधी / बेळगाव
विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान झाले. सायंकाळी 6 पर्यंत मतदारांनी आपला हक्क बजावला. त्यानंतर जिल्ह्यातील 18 मतदारसंघांची आकडेवारी जमविण्यासाठी अधिकाऱ्यांना कसरत करावी लागली. रात्री उशिरापर्यंत आकडेवारी जमविण्याचे काम सुरू होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्व मतदारसंघांतील आकडेवारी जमविल्यानंतर जिल्ह्यामध्ये एकूण 76.95 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे. गुरुवारी निवडणूक विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार सर्वात जास्त अथणी मतदारसंघामध्ये मतदान झाल्याचे पुढे आले. त्याठिकाणी एकूण 83.68 टक्के मतदान झाले आहे. सर्वात कमी बेळगाव उत्तर मतदारसंघामध्ये 59.44 टक्के मतदान झाले आहे.
विधानसभा निवडणूक ही मोठ्या चुरशीने पार पडली. 18 मतदारसंघांसाठी एकूण 187 जण रिंगणात आहेत. त्यामध्ये 174 पुरुष तर 13 महिला उमेदवार आहेत. ही निवडणूक अनेकांनी प्रतिष्ठेची केली होती. अथणी मतदारसंघामध्ये माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आणि महेश कुमठळ्ळी यांच्यामध्ये तुल्यबळ लढत ठरली आहे. त्यामुळेच याठिकाणी सर्वात जास्त मतदान झाले आहे. बेळगाव दक्षिण, उत्तर आणि ग्रामीण मतदारसंघांमध्येही मोठी चुरस निर्माण झाली आहे. म. ए. समितीने साऱ्यांनाच तगडे आव्हान दिल्यामुळे येथेही चुरशीने मतदान झाले आहे. असे असले तरी टक्केवारी मात्र कमी झाल्याचे या आकडेवारीवरून दिसत आहे. बेळगाव उत्तर मतदारसंघामध्ये सर्वात कमी मतदान झाले आहे. त्या खालोखाल दक्षिण मतदारसंघामध्येदेखील 63.61 टक्के मतदान झाले आहे. ग्रामीण मतदारसंघामध्ये मात्र मतदानाची टक्केवारी वाढली असून 79.01 टक्के मतदान झाले आहे.









