राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय प्रवाशांकडे सापडले
पणजी : गोवा राज्यातून सोन्याची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे समोर आले असून गेल्या तीन वर्षात म्हणजे 2020 ते 2022 पर्यंत एकूण 30 किलो सोने गोव्यातून जप्त करण्यात आल्याची माहिती राज्यसभेतील एका प्रश्नाच्या लेखी उत्तरातून देण्यात आली आहे. या तस्करीत गेल्या 3 वर्षात एकूण 36 प्रकरणांची नोंद झाल्याचे समोर आले आहे. बहुतेक सोने दाबोळी विमानतळावर राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय प्रवाशांकडून जप्त करण्यात आल्याची नोंद असून शरीरावर व इतरत्र लपवून सोने आणले जात असल्याचे उघड झाले आहे. वर्ष 2020 मध्ये 7.74 किलो सोने जप्त करण्यात येऊन 7 प्रकरणांची नोंद करण्यात आली, तर 2021 मध्ये 12.22 किलो सोने पकडण्यात आले आणि 13 प्रकरणे नोंदविण्यात आली. 2022 मध्ये 8.9 किलो सोने सापडले व 15 प्रकरणे नोंद झाल्याची माहिती उत्तरातून देण्यात आली आहे. चालू 2023 या नवीन वर्षात 1.19 किलो सोने फेब्रुवारी महिन्यात जप्त करण्यात आले असून एका प्रकरणाची नोंद झाल्याचे उत्तरात नमूद करण्यात आले आहे. विमान वाहतुकीतून सोन्याची तस्करी गोवा राज्यातून मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत असून अनेक विमान प्रवाशांकडे तपासणीच्या वेळी हे सोने सापडल्याचे किस्से समोर आले आहेत. रस्ता किंवा रेल्वे मार्गाने येणाऱ्या प्रवाशांची फारशी कडक तपासणी होत नसल्याने तेथून सोन्याची तस्करी होत असल्यास ते सापडणे तसे कठीण असल्याचे दिसून येत आहे.









