सिरसा आश्र्रमात प्रवेशावर बंदी
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीमला पुन्हा एकदा 30 दिवसांचा पॅरोल मिळाला आहे. तो सध्या रोहतक कारागृहात असून पॅरोलची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बाहेर पडणार आहे. पॅरोलची रजा मंजूर करताना कारागृह प्रशासनाने राम रहीमला सिरसा डेऱ्यात न जाण्याची सूचना केली आहे. त्यामुळे आता त्याला उत्तर प्रदेशातील बागपत येथील बर्नवा आश्र्रमात राहावे लागणार आहे. बाबा राम रहीम यांच्या वास्तव्यामुळे बर्नवा आश्र्रमाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. शिक्षेदरम्यान राम रहीमला मिळालेला हा सातवा पॅरोल आहे. यापूर्वी राम रहीमला जानेवारीत 40 दिवसांचा पॅरोल मिळाला होता. सध्या डेरा प्रमुख राम रहीमचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो पूरग्रस्तांसाठी देवाची प्रार्थना करताना दिसत आहे. त्याचबरोबर डेरा प्रेमींना मदतकार्यात सहभागी होण्यास सांगत आहे. हा व्हिडीओ राम रहीमच्या मागील पॅरोलच्या वेळेचा असल्याचे सांगण्यात येत आहे. राम रहीम बागपत आश्र्रमात असताना आसाममध्ये पूर आला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर डेरा व्यवस्थापनाकडून हा व्हिडीओ जुना असल्याचे सांगण्यात आले.
राम रहीमला मिळालेली पॅरोल रजा…
- 24 ऑक्टोबर 2020 रोजी आईला भेटण्यासाठी पहिल्यांदा पॅरोल.
- 21 मे 2021 ला दुसऱ्यावेळी एक दिवसासाठी पॅरोल देण्यात आला.
- 7 फेब्रुवारी 2022 रोजी तिसऱ्यांदा 21 दिवसांसाठी पॅरोल मिळाला.
- जून 2022 रोजी चौथ्यांदा एका महिन्यासाठी पॅरोल देण्यात आला.
- ऑक्टोबर 2022 मध्ये पाचव्यावेळी 40 दिवसांसाठी पॅरोल मिळाला.
- 21 जानेवारी 2023 रोजी सहाव्यांदा 40 दिवसांसाठी पॅरोल मंजूर.
- 20 जुलै 2023 रोजी सातव्यांदा 30 दिवसांसाठी पॅरोलवर सुटका.









