आतापर्यंत लाखो रुपयांचा खर्च
काही काळ सरावानंतर कार चालविणे शिकता येते असे तुम्ही समजत असाल तर ब्रिटनमधील 47 वर्षीय इसाबेल स्टेडमॅन यांची कहाणी जाणून घेणे गरजेचे आहे. इसाबेल मागील 30 वर्षांपासून ड्रायव्हिंग टेस्ट पास करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण इतक्या वर्षांच्या मेहनतीनंतरही त्यांना यश प्राप्त झालेले नाही. एवढेच नाही तर त्यांनी आतापर्यंत ड्रायव्हिंगच्या प्रशिक्षणावर 10 हजार पौंड्स (सुमारे 10 लाख रुपये) खर्च केले आहेत.
वयाच्या 17 व्या वर्षापासून त्यांनी ड्रायव्हिंग शिकण्यास सुरुवात केली होती. पण 1000 लेसन्स (सरावसत्र) घेतल्यावरही त्या ड्रायव्हिंग टेस्टमध्ये यशस्वी ठरल्या नाहीत. सुपरमार्केटमध्ये काम करणाऱया इसाबेल यांना कारमध्ये बसताच वेगळाच अनुभव येतो आणि तो त्यांच्यासाठी भीतीदायक असतो.
ब्लॅकआउटची समस्या

काय घडतेय हे मला समजतच नाही. मी अचानक तणावाखाली जाते. माझा मेंदू फुटेल असे वाटू लागते आणि त्यानंतर माझी शुद्ध हरपते असे त्या सांगतात. इसाबेल यांना ड्रायव्हिंग शिकताना ‘ब्लॅकआउट’ची समस्या होते. यातून बाहेर पडल्यावर त्यांची कार रस्त्याच्या कडेला उभी असते आणि त्याचे स्टेयरिंग प्रशिक्षकाच्या हातात असते. यामुळे त्या घाबरतात आणि घरी जाऊ पाहतात.
तरीही कार चालविण्यास आतुर
या समस्येनंतरही दोन अपत्यांची आई असलेल्या इसाबेल कार चालविण्यासाठी आतुर आहेत. त्यांना त्यांच्या मुलीला युनिव्हर्सिटीपर्यंत कारने सोडण्याची इच्छा आहे. तसेच दुर्गम भागांमध्ये राहणाऱया नातलगांना सहजपणे भेटण्यासाठी त्यांना कार चालविणे शिकायचे आहे. बहुधा माझा मुलगा आणि मुलगी (22 वर्षीय डॉमिनिक आणि 17 वर्षीय स्टेला) माझ्यासमोर ड्रायव्हिंग टेस्ट पास करतील असे त्यांनी म्हटले आहे.
एक दिवस नक्की यशस्वी होणार
सध्या त्यांची मुलगे ड्रायव्हिंग लेसन्स घेत असून यात त्यांना कुठल्याही प्रकारची समस्या आलेली नाही. ड्रायव्हिंग मला आवडते, पण ते माझ्यासाठी अशक्य असल्याचे वाटते. 30 वर्षे वाईट स्वप्नाप्रमाणे गेली असली तरीही एक दिवस मी नक्की ड्रायव्हिंग टेस्ट पास करेन अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.









