मँचेस्टर सिटी पराभूत झाल्याने लिव्हरपूलच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब
वृत्तसंस्था/ लिव्हरपूल
लिव्हरपूलने अखेर इंग्लिश प्रिमियर लीगमधील जेतेपदाचा दुष्काळ 30 वर्षांनंतर संपुष्टात आणला असून गुरुवारी चेल्सीने मँचेस्टर सिटीचा पराभव केल्यानंतर त्यांच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब झाला. या निकालानंतर लिव्हरपूलच्या समर्थकांनी ऍनफील्ड मैदानबाहेर सोशल डिस्टन्सिंगचा विचार न करता प्रचंड जल्लोष करून विजयोत्सव साजरा केला. इंग्लिश टायटल जिंकण्याची त्यांची ही एकंदर 19 वी वेळ आहे.
बुधवारी लिव्हरपूलने क्रीस्टल पॅलेसचा 4-0 असा एकतर्फी पराभव करून जेतेपदाच्या उंबरठय़ावर पोहोचण्याची कामगिरी केली होती. त्यानंतर गुरुवारी चेल्सी व मँचेस्टर सिटी यांच्या सामन्यातील निकालावर त्यांचे जेतेपद निश्चित होणार होते. सिटीने सामना जिंकला असता तर लिव्हरपूलला चॅम्पियन्स होण्यासाठी आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागली असती. पण चेल्सीने मँचेस्टर सिटीचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव केला आणि लिव्हरपूल या मोसमातील इंग्लिश चॅम्पियन्स बनले. जुर्गेन क्लॉप यांच्या मार्गदर्शनाखाली या संघाने 30 वर्षाचा दुष्काळ संपवून जेतेपदापर्यंत झेप घेतली. याआधी त्यांनी चॅम्पियन्स लीगचेही जेतेपद मिळविले आहे.
या लीगचे अद्याप सात सामने बाकी असतानाच लिव्हरपूलने विजेतेपद मिळविले आहे. त्यांचे 31 सामन्यांत 86 गुण झाले तर दुसऱया स्थानावरील सिटीचे 63 गुण झाले आहेत. चेल्सी-सिटी सामना संपल्यानंतर ‘आम्ही आता प्रिमियर लीगचे चॅम्पियन्स आहोत,’ असा संदेश लिव्हरपूलने ट्विटरवर टाकला तर मँचेस्टर सिटीने त्यांचे अभिनंदन करणारा संदेश दिला. ‘आमच्यासाठी हा अत्यंत मोलाचा आणि मोठा क्षण असून मी पूर्णपणे भारावून गेलो आहे,’ अशा भावना क्लॉप यांनी व्यक्त केल्या. ही स्पर्धा जिंकणारे ते जर्मनीचे पहिले प्रशिक्षक आहेत. लिव्हरपूलचा कर्णधार जॉर्डन हेन्डरसन यानेही क्लॉप यांच्या मार्गदर्शनाच्या प्रभावाने संघ पूर्णतः बदलून गेला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला आणखी यश मिळवायचे आहे,’ असे तो म्हणाला.
जेतेपद निश्चित झाल्यानंतर ऍनफिल्डजवळ चाहत्यांनी आनंदोत्सव साजरा करण्यासाठी मोठी गर्दी केली. अनेकांनी मास्क घातले होते. पण सोशल डिस्टन्सिंग कोणीही पाळताना दिसत नव्हते. त्यांनी आतषबाजी करून गाणीही म्हटली. काहींनी कार्स मैदानाजवळ येऊन हॉर्न वाजवत आनंद व्यक्त केला. लिव्हरपूलने सात सामने बाकी असतानाच जेतेपद मिळविण्याचा नवा विक्रम केला आहे. याआधी मँचेस्टर सिटी व मँचेस्टर युनायटेड यांनी पाच सामने बाकी असताना जेतेपद मिळविले होते. हा विक्रम लिव्हरपूलने यावेळी मागे टाकला. यापूवीं 2014 मध्ये लिव्हरपूलला जेतेपद मिळविण्याची सुवर्णसंधी मिळाली होती. पण त्यावेळी कर्णधार स्टीव्हन गेरार्डने चेल्सीविरुद्धच्या निर्णायक सामन्यात चूक केली आणि त्यांची जेतेपदाची संधीही हुकली होती. मँचेस्टर युनायटेडने आतापर्यंत 20 वेळा ही स्पर्धा जिंकली असून लिव्हरपूल फक्त एकने मागे आहे. मँचेस्टर सिटीने 2017-18 मध्ये 100 गुण मिळविण्याचा विक्रम केला होता. तो विक्रमही लिव्हरपूलला मागे टाकण्याची संधी मिळाली आहे.









