जगातील अनेक उत्कृष्ट चित्रपट सत्यकथांवर आधारित असतात. चुकून 70 पाउंड्स म्हणजेच सुमारे 30 किलो कोकेन चुकून गिळणाऱया अस्वलावर चित्रपट येईल असा विचारही कुणी केला नसेल. या नव्या चित्रपटाचे नाव कोकेन बियर असून हॉलिवूडच्या एलिझाबेथ बँक्स याचे दिग्दर्शन करणार आहेत.
हा चित्रपट 1985 मध्ये झालेल्या एका घटनेवर आधारित असेल. ड्रग्स स्मगलर (तस्कर) एंड्रय़ू थॉर्टनने मेक्सिकोतून हवाई प्रवास करताना अमेरिकेच्या जॉर्जियामध्ये कोकेनची काही पाकिटे टाकली होती. यातील एक पाकिट जॉर्जियाच्या चाट्टाहोचे नॅशनल पार्कमध्ये कोसळले होते. हे पाकिट चुकून या अस्वलाने खाल्ले होते आणि काही वेळानंतर त्याचा मृत्यू झाला होता.
या अस्वलाने अत्यंत अधिक प्रमाणात कोकेनचे सेवन केले होते. इतक्या प्रमाणात कोकेनचे सेवन केल्यावर कुठलाच प्राणी जिवंत राहू शकत नाही असे एका वैद्यकीय कर्मचाऱयाने सांगितले होते. स्मगलर होण्यापूर्वी एंड्रय़ू नार्कोटिक्स पोलीस दलात काम करायचा आणि त्याने वकिलीचे शिक्षणही घेतले होते.
40 वर्षीय एंन्ड्रय़ूने स्वतःच्या विमानाला ऑटोपायलट करून विमानातून उडी घेतली होती. पण त्याचा पॅराशूट न खुलल्याने त्याचा मृत्यू झाला होता. एंड्रय़ूच्या मृतदेहाजवळून रोख रक्कम, गन आणि चाकूही मिळाला होता. त्याने बुलेटप्रूफ जॅकेट परिधान केले होते तसेच नाइट व्हिजन गॉगल्स त्याने घातलेले होते. एंड्रय़ू आणि अस्वलाचा मृत्यू त्या काळात चर्चेचा विषय ठरला होता.
नव्या चित्रपटाची पटकथा जिमी वॉर्डनने लिहिली आहे. यापूर्वी ते द रुममेट आणि द बेबीसीटर या चित्रपटांच्या प्रकल्पात सामील होते. तर चित्रपटाची निर्मिती फिल लॉर्ड आणि क्रिस मिलर करत आहेत.