उत्तराखंडमध्ये स्थिती सुधारली :
कोरोना विषाणूच्या विरोधात भारत मोठी लढाई लढत आहे. कोरोना संकटादरम्यान उत्तराखंडमधील चारधाम यात्रा यंदा सुरू न होण्याची शक्यता आहे. परंतु चारधाममधील दर्शन सुरू होण्यापूर्वीच खूषखबर हाती लागली आहे. राज्यात मागील 5 दिवसांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण सापडून आलेला नाही.
उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग
चारधाम यात्रेचा पहिला टप्पा उत्तरकाशी जिल्हा असून येथील यमुनोत्री आणि गंगोत्रीचा यात समावेश होता. उत्तरकाशीमध्ये पोलीस प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. 26 एप्रिल रोजी दर्शनास प्रारंभ होणार असून सुरक्षा दल यापूर्वीच तैनात करण्यात आले आहे. दिशानिर्देशांनुसार 20 एप्रिलनंतर स्थितीचे विश्लेषण केले जाणार आहे. 4 धामच्या तिन्ही जिल्हय़ांमध्ये (उत्तरकाशी, रुद्रप्रयाग आणि चमोली) एकही कोरोनाबाधित नसल्याची माहिती पोलीस अधीक्षक पंकज भट यांनी दिली आहे.
खबरदारीचे उपाय
केदारनाथ आणि बद्रीनाथच्या रावलांना सोशल डिस्टेंसिंग अंतर्गत 14 दिवस क्वारेंटाईन करण्यात आल्याची चर्चा आहे. यमुनोत्री आणि गंगोत्रीचे पुजारी स्थानिक असल्याने त्यांना क्वारेंटाईन करावे लागणर नाही, तर बद्रीनाथ आणि केदारनाथचे रावल दक्षिण भारतातून येतात. गंगोत्री आणि यमुनोत्री धाममध्ये एकूण 8 ते 10 लाख भाविक येत असतात. 2018 मध्ये 7.5 लाख भाविक पोहोचले होते. तर 2019 मध्ये भाविकांचा आकडा 10 लाखांपेक्षा अधिक झाला होता अशी माहिती भट यांनी दिली आहे.
अर्थव्यवस्था अवलंबून
चारधाम यात्रेला उत्तराखंडच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे स्थान आहे. 12 हजार कोटींपेक्षा अधिक उलाढाल चारधाम यात्रेच्या माध्यमातून होते. राज्यातील 30 टक्के लोकसंख्या चारधामवर अवलंबून आहे. 6 महिन्यापर्यंत चालणाऱया यात्रेवर गढवाल क्षेत्राची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. कोरोना संकटामुळे यात्रेसंबंधी साशंकता निर्माण झाल्याने 90 टक्के बुकिंग रद्द झाले आहे. परंतु यात्रेसंबंधी राज्य सरकारकडून अद्याप कुठलाच निर्णय घेण्यात आलेला नाही.
1300 विदेशी पर्यटक अडकले
देहरादूनचे वैद्यकीय महाविद्यालय, आहुजा लॅब्ज आणि भारतीय पेट्रोलियम संस्थेला नमुन्यांची तपासणी करण्याची अनुमती मिळाली आहे. श्रीनगर वैद्यकीय महाविद्यालयासाठी अनुमती घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. टाळेबंदीमुळे उत्तराखंडमध्ये 1300 विदेशी पर्यटकांसह सुमारे 2.5 हजार लोक अडकून पडले आहेत. यात पश्चिम बंगालमधील 175 पर्यटकांचा समावेश आहे. तर उत्तरप्रदेश, महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेशचे पर्यटकही राज्यात अडकून पडले आहेत.
संसर्गावर नियंत्रण
उत्तराखंडमध्ये स्थिती नियंत्रणात असली तरीही जगात या महामारीचे दुष्परिणाम पाहता दीर्घकाळ सतर्कता बाळगण्यासह सजग राहण्याची गरज आहे. मागील 100 तासांमध्ये एकही नवा रुग्ण सापडलेला नाही. तसेच 7 जणांना कोरोनापासून मुक्तता मिळाली आहे. अन्य रुग्णांचा दुसरा अहवाल निगेटिव्ह येण्याची शक्यता पाहता स्थिती नियंत्रणात असल्याचे उद्गार मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनी काढले आहेत.









