ऑनलाईन टीम / तरुण भारत :
भीक मागण्यासाठी पुण्यातून तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण करणाऱ्या महिलेला पोलिसांनी श्रीगोंदा येथून अटक करत मुलीची सुखरुप सुटका केली आहे. उषा नामदेव चव्हाण (40) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,पुण्यातील ढोले-पाटील रोडवर एका फुगे विकणाऱ्या महिलेच्या तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण झालं होते. 23 मे रोजी दुपारी दीडच्या सुमारास ही मुलगी आईसह एका रिक्षात झोपली होती. तेव्हा या मुलीला आरोपी महिलेने अलगद उचलून पळवून नेले होते. मुलीच्या आईने दोन दिवस तिचा शोध घेतला. मात्र, मुलगी न सापडल्याने 25 मे रोजी तिने कोरेगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तब्बल 5 दिवस 250 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे आणि आरोपी महिलेल्या हातातल्या लोकल दुकानाच्या पिशवीवरच्या नावावरुन थेट श्रीगोंदा गाठला. तिथे चौकशी करत पोलीस थेट त्या महिलेच्या घरी पोहचले. तिथे महिलेला अटक करुन त्यांनी मुलीची सुखरूप सुटका केली.
आरोपी उषा चव्हाण ही श्रीगोंद्याची रहिवासी असून, रेकॉर्डवरची सराईत गुन्हेगार आहे. तिला दोन मुले आणि दोन मुली आहेत. तिच्या समाजात मुलीचं लग्न करताना मुलाकडून हुंडा घेण्याची प्रथा आहे. अपहरण झालेल्या मुलीला भीक मागायला लावणं तसेच पुढे तिचं लग्न करून हुंडा मिळवण्याचा तिचा हेतू होता. त्यासाठी तिने या मुलीचे अपहरण केले होते.









