सुंदर नक्षीकाम पाहून वैज्ञानिक अवाप्
इजिप्त नेहमीच लोकांच्या आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. इजिप्तमधील ममी असो किंवा मकबरे लोकांमध्ये मोठे कुतुहल निर्माण करत असतात. अलिकडेच इजिप्तमध्ये पुरातत्वतज्ञांना सक्काराच्या एका प्राचीन दफनभूमीत सुमारे 3300 वर्षे जुने अनेक मकबरे आणि मंदिर मिळाले आहे.
यातील सर्वात मोठा मकबरा ‘पॅनेसी’च्या नावाच्या एका व्यक्तीचा होता, जे ‘अमुनच्या मंदिराचे ओवरसियर’ होते अशी माहिती नेदरलँड्स नॅशनल म्युझियम ऑफ एंटिक्विटीजमधील इजिप्त तसेच न्युबियन कलेक्शनच्या क्यूरेटर आणि ‘द वॉकिंग डेड ऍट सक्कारा’ पुस्तकाच्या लेखिका लारा वीस यांनी दिली आहे.

पॅनेसीचा मकबरा अत्यंत उत्तमप्रकारे निर्माण करण्यात आला होता. तेथे रंगांच्या मोठय़ा खुणा दिसून येतात. शिलालेखांवरील तपशील पाहता पॅनेसी यांना अपत्य नव्हते. पॅनेसीच्या मकबऱयात मानवी अवशेषही आढळले आहेत. या अवशेषांचे विस्तृत अध्ययन केले जाणार असल्याचे लारा यांनी सांगितले आहे.
आणखी एका मकबऱयाचा शोध लागला असून तो ‘युयू’ नावाच्या एका व्यक्तीचा आहे. हा व्यक्ती राजघराण्याशी संबंधित एक खास कलाकार होता. युयूचा मकबरा हा पॅनेसीच्या मकबऱयाच्या तुलनेत छोटा आहे, यात काही कलाकृती आहेत. या कलाकृतींवर त्याच्या कुटुंबातील चार पिढय़ांना रेखाटण्यात आले आहे. यात त्याचे आईवडिल, तो स्वतः आणि त्याची पत्नी मुलांसमवेत भाऊ, त्याची मुले आणि नातवंडं सामील आहेत असे लारा यांनी सांगितले.
तर एका मकबऱयाच्या मालकाचा शोध लागलेला नाही. यातील मूर्ती पाहता चार लोक एकाच कुटुंबातील असल्याचे वाटते. या मकबऱयांमधील सजावट पाहून इटलीच्या कोर युनिव्हर्सिटीतील इजिप्त विषयक प्राध्यापक फ्रांसेस्को तिराद्रिति अत्यंत प्रभावित झाले आहेत. या मकबऱयांद्वारे कलाकाराने प्राचीन इजिप्तच्या कलेचा एक दुर्लभ नमुना सादर केला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सक्कारामध्ये पुरातत्व विभागाकडून अध्ययन कार्य सुरू आहे. लीडनेच्या नॅशनल म्युझियम ऑफ एंटिक्विटीज आणि टय़ूरिनच्या इजिप्शिय म्युझियमचे स्कॉलर्स येथे काम करत आहेत.









