गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव
अमेरिकेत राहणाऱया एका व्यक्तीने डिस्नेलँडचा सातत्याने सर्वाधिक दौरे करत जागतिक विक्रम केला आहे. या व्यक्तीचे नाव जेफ रिट्ज असून तो कॅलिफोर्नियाचा रहिवासी आहे. डिस्नेलँडला पृथ्वीवरील सर्वात आनंददायी ठिकाण म्हटले जाते. रिट्जने सलग 2995 दिवसांपर्यंत येथील दौरा केला आहे. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डनुसार जेफने एक जानेवारी 2012 रोजी कॅलिफोर्नियाच्या पार्कांमध्ये दौरा सुरू केला होता.

जेफ स्वतःच्या या कामगिरीवर अत्यंत आनंदी आहे. मागील आठवडय़ात गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्सने माझ्याशी संपर्क साधला होता. तसेच त्यांनी आता स्वतःच्या वेबसाइटवर कहाणी पोस्ट केली असून यात माझ्या ऍडव्हेंचर्सने विक्रम नोंदविला असल्याचे नमूद केले आहे. मला अधिकृतपणे ‘डिस्नेलँडच्या सातत्याने दौऱयां’करता गिनिज वर्ल्ड रेकॉर्डधारकाचा मान देण्यात आला असल्याचे जेफने सोशल मीडियावर नमूद केले आहे.
कॅलिफोर्नियाच्या हंटिंग्टन बीच येथे राहणारे 50 वर्षीय जेफ यांनी 2017 मध्ये सलग 2000 दौऱयांनंतर पहिल्यांदा लक्ष वेधून घेतले होते. 2012 मध्ये नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी पूर्वाश्रमीच्या प्रेयसीसोबत हा प्रवास सुरू केला होता. लीप वर्षादरम्यान दरदिनी थीम पार्कमध्ये जाणे मजेशीर ठरणार असल्याचा विचार दोघांनीही केला होता. तेव्हा आम्ही दोघेही बेरोजगार होतो असे जेफने म्हटले आहे.









