वृत्तसंस्था/इस्लामाबाद
पाकिस्तानात गुरुवारी सकाळी एका पोलीस चौकीवर बंदूकधाऱ्यांनी हल्ला करून तीन पोलिसांना ठार केले. तसेच अन्य पाच जण जखमी झाले आहेत. वायव्य पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील करक जिह्यातील बहादूर खेल चेकपोस्टवर शस्त्रधारी हल्लेखोरांनी गोळीबार केल्याचे पोलिसांनी सांगितले. या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलिसांना करक येथील जिल्हा मुख्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच गंभीर जखमी झालेल्या तीन पोलिसांना पेशावर येथे हलवण्यात आले आहे. घटनेनंतर संपूर्ण परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. अद्याप कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेल्याचे जिल्हा पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. घटनेनंतर मोठ्या प्रमाणात पोलीस दल घटनास्थळी पोहोचले असून गुन्हेगारांना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे.









