दूधाच्या थकबाकीवरून बेछूट गोळीबार
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारची राजधानी पाटणा येथे 400 रुपयांच्या वादातून दोन गटांमध्ये मारहाण झाली. यानंतर दोन्ही गटांनी केलेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला असून एक युवक जखमी झाला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तेथे मोठा बंदोबस्त ठेवत स्थितीवर नियंत्रण आणले आहे.
ही घटना गुरुवारी रात्री उशिरा सुरगा पर गावात घडली आहे. याप्रकरणी आतापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आली आहे. एक रायफल, शॉटगन हस्तगत करण्यात आली आहे. तर तिन्ही मृतदेहांवर उत्तरीय तपासणी करत ते संबंधितांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजीव मिश्रा यांनी दिली आहे.
एकाच समुदायच्या लोकांदरम्यान दूधाच्या देवाणघेवाणीशी संबंधित केवळ 400 रुपयांवरून वाद होता. याच वादातून 2 गटांमध्ये गोळीबार झाला आहे. यात 3 जण मारले गेले असून एक युवक जखमी झाला आहे. पोलिसांकडून आरोपींची धरपकड करण्यासाठी छापे टाकले जात असल्याचे पोलीस अधीक्षकांकडून सांगण्यात आले.









