वृत्तसंस्था/ रायगढ
छत्तीसगडच्या रायगढ जिल्ह्यात हत्तींचा मोठा उपद्रव सुरू आहे. रायगढ येथील ग्रामीण भागात पोहोचून हत्तींचा कळप पिकांची हानी करण्यासह घरांचे नुकसान करत आहे. तर मंगळवारी रात्ती हत्तीच्या हल्ल्यात तीन जणांना जीव गमवावा लागला आहे.
हत्तीच्या हल्ल्यानंतर गावात दहशतीचे वातावरण आहे. तर वन विभागाच्या पथकाने गावात धाव घेत पुढील कारवाई हाती घेतली आहे. लैलूंगाच्या गोसाईडीह गावात हत्तीने केलेल्या हल्ल्यात तीन वर्षीय सत्यम राउत याला जीव गमवावा लागला आहे. तर अंगेकेला गावात एका महिलेला शेतात चिरडल्यावर हत्तीने घरात झोपलेल्या युवकावर भिंत पाडून त्याचा जीव घेतला आहे.
गावांमध्ये एक हत्ती स्वत:च्या पिल्लासह फिरत होता, रात्र होताच त्या हत्तीने मोठे नुकसान घडवून आणले आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. तर तीन जणांचा मृत्यू झाल्यानंतर वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गावात पोहोचून आवश्यक उपाययोजना हाती घेण्यास सुरुवात केली आहे.








