लावा’ कंपनीच्या अधिकाऱ्यावरही मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कारवाई
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी चिनी कंपनी वीवो मोबाइलच्या तीन तर लावा कंपनीच्या एका अधिकाऱ्याला अटक केली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. आरोपींमध्ये चिनी नागरिक गुआंगवेन क्यांग, लावा इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक हरिओम राय यांच्यासोबत चार्टर्ड अकौंटंट राजन मलिक तसेच नितिन गर्ग यांचा समावेश आहे. सुमारे वर्षभरापूर्वी ईडीने वीवो मोबाइल्स आणि त्याच्या 23 सहाय्यक कंपन्यांच्या 48 ठिकाणांवर छापे टाकले होते, या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.
चीनला अवैध स्वरुपात रक्कम हस्तांतरित करण्याच्या उद्देशासह भारतात अनेक कंपन्यांना इनकॉर्पोरेट करण्यात आले होते. याचबरोबर वीवो मोबाइल्स इंडियाने स्वत:च्या विक्रीद्वारे प्राप्त उत्पन्नाचा जवळपास निम्मा हिस्सा (सुमारे 1.25 लाख कोटी रुपये)चीनमध्ये हस्तांतरित केला होता. या कृतीतून चिनी कंपनीने करचुकवेगिरी केली होती असा ईडीचा आरोप आहे.
दिल्ली पोलिसांकडून एफआयआर
दिल्ली पोलिसांनी वीवोची सहाय्यक कंपनी ग्रँड प्रॉस्पेक्ट इंटरनॅशनल कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड (जीपीआयसीपीएल), त्याचे संचालक, शेअरहोल्डर्स आणि सर्टिफाइंग प्रोफेशनल्स विरोधात गुन्हा नोंदविला होता. याच एफआयआरच्या आधारावर ईडीने 3 फेब्रुवारी 2022 रोजी मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा नोंदवून स्वत:चा तपास सुरू केला होता.
2014 मध्ये स्थापन कंपनी
ईडीनुसार वीवो मोबाइल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला 1 ऑगस्ट 2014 रोजी हाँगकाँग येथील कंपनी मल्टी एकॉर्ड लिमिटेडची सहाय्यक कंपनी म्हणून स्थापन करण्यात आले होते. तर आरओसी दिल्लीत नोंदणीकृत करण्यात आली होती. जीपीआयसीपीएलची स्थापना सीए नितिन गर्ग, झेंगशेन ओउ, बिन लू आणि झांग जी यांनी केली होती. 3 डिसेंबर 2014 रोजी आरओसी शिमला येथे नोंदणीकृत करण्यात आली होती. बिन लू यांनी 26 एप्रिल 2018 रोजी भारत सोडला होता. झेंगशेन ओउ आणि झांग जी हे 2021 मध्ये भारतातून बाहेर पडले होते.
चिनी कंपन्यांचे वर्चस्व
देशात मोबाइल मार्केटवर चिनी कंपन्यांचे वर्चस्व आहे. 2021-22 मध्ये चिनी मोबाइल हँडसेट कंपन्यांचे भारतातील उत्पन्न सुमारे 1.5 लाख कोटी रुपये राहिल्याचा अनुमान आहेशी माहिती केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी अलिकडेच दिली आहे.









