कोल्हापूर- शहरातील शाहूपुरी पोलिस ठाण्यासह जिह्यातील इचलकरंजी, आजरा येथे नवीन पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. लवकरच या तिनही पोलीस ठाण्यांना मंजूरी देवून सुरू करण्याचा आपला प्रयत्न असल्याची घोषण पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली. तसेच सायबर क्राईम व नाक्रो टेस्ट या गोष्टींवर विशेष लक्ष केंद्रीत करण्याच्या सुचनाही दिल्या.
रविवारी सायंकाळी पोलिस मुख्यालयातील उद्यानाचा उद् घाटन समारंभ आणि जिल्हा पोलिस दलाचा स्नेहमेळावा पार पडला. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया आणि पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, सीआयडीचे पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी, अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, सोशल मीडियाचे सर्वांवर लक्ष आहे. विविध जाहीरातील, भूलथापा आधारे सर्वसामान्यांची आर्थिक फसवणुकीसह व्हाईट कॉलर गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा. सायबर क्राईम व नाक्रो टेस्ट या दोन्ही गोष्टीवर फोकस करा. काळानुसार पोलिस दलातील सर्व प्रणाली अपडेट हवी. जिल्हा पोलिस दलात उच्च शिक्षित कर्मचारी आहेत. त्यांचा त्या त्या क्षेत्रात उपयोग करून घ्या. जिह्यातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱयांची मुले जिह्यातच शिक्षण घेतात. त्या मुलांच्या राहण्याची व्यवस्था जिल्हा पोलिस दल करते ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. पोलिसांसाठी व्यायामशाळा, वेगवेगळी क्रीडांगणे लवकरच उपलब्ध करून दिली जातील. त्याचबरोबर कोल्हापूरसह इचलकरंजीत सीसी टीव्हींचे जाळे वाढविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, गृह पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील, शहर पोलिस उपअधीक्ष मंगेश चव्हाण, शंकरलाल लोहिया आदीसह अधिकारी व त्यांचे कर्मचारी उपस्थित होते. पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी सूत्रसंचालन केले.
कोल्हापुर पोलीसांचे विशेष कौतुक
गेल्या दोन तीन वर्षात महापूर, कोविड काळात जिल्हा पोलिस दलाने उल्लेखनीय कार्य केले आहे. पोलीस दलातील कर्मचारी, अधिकाऱयांनी आपल्या जिवाची पर्वा न करता या काळात काम केले आहे. याबद्दल पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापुर पोलीस दलाचे विशेष कौतुक केले.