वृत्तसंस्था / सुकमा
गेल्या महिन्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या एका पथकावर हल्ला करणाऱ्या तीन नक्षलवाद्यांना छत्तीसगडमधील सुकमा येथे अटक करण्यात आली आहे. पांडूमेता टेकड्यांच्या भागातून त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. यासाठी राज्य पोलिस आणि केंद्रीय सुरक्षा दले यांनी संयुक्त अभियान चालविले होते.
या अभियानात केंद्रीय राखीव पोलीस दल, वेगवान कृती कमांडो दल, विशेष कृती दल आणि जिल्हा पोलीस यांनी भाग घेतला. गुप्तचरांनी हे नक्षलवादी टेकड्यांवर लपले असल्याची माहिती पुरविली होती. त्या आधारावर कारवाई करण्यात आली. मदकाम हांडा, मिदियाम पुडिया आणि कोरसा धुर्वा अशी अटक केलेल्यांची नावे असून त्यांच्यावर केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या वाहनांवर हल्ला केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या हल्ल्यात दलाचा एक अधिकारी मृत्यूमुखी पडला होता आणि एक कॉन्स्टेबल जखमी झाला होता.
संघटनेवरही कारवाई होणार
अटक केलेले नक्षलवादी दंडकारण्य आदीवासी किसान मजदूर संघटनेचे हस्तक असल्याची माहिती देण्यात आली आहे. बंदी घालण्यात आलेल्या सीपीआय माओवादी या संघटनेची शाखा म्हणून ही संघटना कार्यरत आहे. या संघटनेने आजपर्यंत अनेक हिंसक कृत्यांमध्ये सहभाग घेतलेला असून अन्य बेकायदेशीर कृत्ये करणाऱ्या संघटनांना साहाय्य केलेले आहे, असा आरोप करण्यात आला.
आतापर्यंत चार जणांना अटक
17 डिसेंबरला केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या पथकावर हल्ला केल्याप्रकरणी आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. एका नक्षलवाद्यास यापूर्वीच ताब्यात घेण्यात आले होते. आता राज्य सरकार दंडकारण्य आदीवासी किसान मजदूर संघटनेवरच कारवाई करण्याची योजना सज्ज करीत आहे.









