खेड प्रतिनिधी
तालुक्यातील तिसंगी मुस्लिम मोहल्याजवळील जंगलमय भागात गावठी दारूच्या हातभट्टीवर जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या आदेशानुसार पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने टाकलेल्या धाडीत 2 लाख 96 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
तिसंगी येथील जंगलमय भागात गावठी हातभट्टीच्या दारूचे उत्पादन सुरू असल्याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सुजित सोनावणे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक आर्तेकर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अनुराग बर्वे, पोलीस शिपाई रुपेश जोगी, नीलेश माने, सागर नवाळे, राहुल कोरे, राम नागुलकर आदींच्या पथकाने संयुक्तरित्या अचानकपणे धाड टाकली.
या धाडीत गावठी हातभट्टीची दारू निर्मिती करण्यासाठी आवश्यक साहित्य व 26 प्लास्टिकच्या बॅरलमधून 13 हजार लिटर कुजलेले रसायन अशा 2 लाख 96 हजार रूपये किंमतीचे रसायनाचा नाश करून हातभट्टी उद्ध्वस्त करून टाकण्याची कामगिरी पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली. या धाडसत्राने गावठी हातभट्टीच्या दारूचे उत्पादन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.









