2 बेटांबाबत विचित्र स्थिती, टाइम ट्रॅव्हलचा अनुभव
पृथ्वीची अनेक अनोखी रुपं असून त्याबद्दल जाणून घेतल्यावर माणूस दंग होतो. रशिया आणि अमेरिकेदरम्यान असलेल्या दोन बेटांबाबत असाच प्रकार आहे. ही दोन्ही बेटं परस्परांपासून केवळ 3 किलोमीटर अंतरावर आहेत, परंतु दोघांवरील प्रमाणवेळ वेगवेगळी आहे. जर तुम्ही या दोन्ही बेटांपैकी एकावर प्रवास करत असल्यास प्रत्यक्षात टाइम ट्रॅव्हलचा अनुभव घेऊ शकता.
अलास्का आणि सायबेरिया हे अमेरिका आणि रशिया यांच्यातील दोन असे हिस्से आहेत, जे अत्यंत थंड आहेत. जगाचा नकाशा पाहिल्यास अमेरिका आणि रशिया परस्परांपासून अत्यंत दूर असल्याचे दिसून येते. परंतु दोन्ही देश एका अर्थाने परस्परांपासून अत्यंत नजीक आहेत. अलास्का आणि सायबेरिया यांच्यातील अंतर सुमारे 82 किलोमीटर आहे. या दोन्ही भूभागांदरम्यान बियरिंग स्ट्रेट म्हणजेच सामुद्रधुनी आहे. याच मार्गावर दोन अनोखी बेटं आहेत. एका बेटाचे नाव बिग डायोमीड तर दुसऱ्याचे नाव लिटिल डायोमीड आहे.
लिटिल डायोमीड अमेरिकेचा हिस्सा आहे, तर बिग डायोमीड रशियाचा हिस्सा आहे. या दोन्ही बेटांदरम्यान अंतर केवळ 3.8 किलोमीटर आहे. येथे काही लोकांचे वास्तव्य देखील असून ते सहजपणे एका बेटावरून दुसऱ्या बेटावर ये-जा करू शकतात. परंतु आ़श्चर्याची बाब म्हणजे दोन्ही बेटांवरील वेळेत 21 तासांचा फरक आहे. एका बेटावर दुसरा दिवस सुरू झाला तरीही दुसऱ्या बेटावर अगोदरचा दिवस सुरू असतो. याचमुळे या बेटांना येस्टर्डे अँड टुमारो आयलँड या नावाने देखील ओळखले जाते.
दोन्ही बेटांच्या तारखांमध्येही फरक
हा फरक अमेरिका-रशिया मेरीटाइम बॉर्डर आणि दोघांमधून इंटरनॅशनल डेट लाइन क्रॉस होत असल्याने निर्माण झाला आहे. बिग डायोमीड याबाबतीत पुढे असल्याने त्याला टुमारो आयलँड म्हटले जाते. आंतरराष्ट्रीय तिथी रेषा (आयडीएल) प्रशांत महासागराच्या मध्यातील एक काल्पनिक रेषा आहे. ही पृथ्वीच्या पृष्ठभागाला उत्तर ध्रूवापासून दक्षिण ध्रूवापर्यंत विभागते. जर तुम्ही पश्चिमेच्या दिशेने जात याला ओलांडल्यास तुम्हाला एक दिवसाचा लाभ होतो. तर पूर्वेच्या दिशेने प्रवास करत आयडीएल ओलांडल्यास तुमचा एक दिवस घटतो. छोट्या बेटावर 100 पेक्षाही कमी लोक राहतात. तर मोठ्या बेटावर कुणीच राहत नाही. येथील लोक दुसऱ्या महायुद्धानंतर रशियाच्या मुख्य भूमीवर स्थायिक झाले होते. तरीही लोक सहजपणे या बेटांवर ये-जा करू शकतात.









