वृत्तसंस्था/ हैदराबाद
तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे रविवारी आग लागून झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पती-पत्नीसमवेत त्यांच्या 5 वर्षीय मुलाचा समावेश आहे. आगीची दुर्घटना कुशाईगुडा येथे घडली आहे. तेथील लाकडाच्या डेपोमध्ये रविवारी सकाळी भीषण आग लागली आणि पाहता पाहता ही आग नजीकच्या एका घरापर्यंत फैलावली. लाकडाच्या डेपोमध्ये एका गॅस सिलिंडरमध्ये स्फोट झाला आणि यातूनच आग लागली. अग्निशमन दलाच्या चार वाहनांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
मृतांमध्ये नरेश (35 वर्षे), त्यांची पत्नी सुमा (28 वर्षे) आणि पुत्र जोशित (5 वर्षे) यांचा समावेश आहे. या दांपत्याचा एक मुलगा दुर्घटनेपूर्वी नातेवाईकाच्या घरी गेल्याने बचावला आहे. तर शहरात एका अन्य ठिकाणी लागलेल्या आगीत दुकान अन् गोदाम जळून खाक झाले आहे. ही दुर्घटना बहादुरपुरा येथे घडली आहे. परंतु येथे जीवितहानी झालेली नाही.









