► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्लीच्या दर्यागंज भागात एक इमारत कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकलेले असल्याने जीवीतहानी वाढण्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मृतांची नावे झुबैर, गुलसगर आणि तौफिक अशी आहेत. कच्च्या बांधकामामुळे इमारत कोसळली असे प्राथमिक अनुमान आहे.
दिल्लीत सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असून त्यामुळे अनेक इमारती खचल्या आहेत. ही इमारतही पावसामुळे कोसळल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बुधवारी दुपारी ही घटना घडल्यानंतर आपत्तीनिवारण दलांच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित बचावकार्याचा प्रारंभ केला. काही जणांचे जीव वाचविण्यात त्यांना यश आले. तथापि, अरुंद मार्गांमुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत. बुधवारी रात्रीपर्यंत इमारतीच्या समोरचा मार्ग मोकळा करण्यात आला होता. ढिगारा हलविण्यासाठी आणखी कालावधी लागेल, असे स्पष्ट करण्यात आले होते.









