गुहागर / प्रतिनिधी :
जिल्ह्यात शुकवारी तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात तिघेजण दुदैवीरित्या ठार तर तिघे गंभीर झाल्याची घटना घडली.
पहिल्या घटनेत गुहागर तालुक्यातील शृंगारतळी-आबलोली मार्गावर शिर येथील अवघड वळणावर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी झाडावर आदळून झालेल्या अपघातात 20 वर्षीय तरूणाचा मृत्यू तर या दुचाकीवर पाठीमागे बसलेला तरूण गंभीर जखमी झाला. हा अपघात शुकवारी पहाटे 6.30 वाजता घडला. शैलेश सुनील जाधव (कादवड-चिपळूण) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे, तर दुचाकीवर पाठीमागे बसलेला रोहित दीपक कदम (19, रा. कादवड-चिपळूण) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रूग्णालयात अधिक उपचार सुरू आहेत. हे दोघेही पहाटे शृंगारतळी येथून आबलोलीकडे येत होते. शिर येथील अवघड वळणावर आले असता दुचाकीचालक जाधव याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व रस्त्याशेजारील काजूच्या झाडावर दुचाकी आदळून अपघात घडला.
या अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी दोघांनाही गंभीर जखमी अवस्थेत आबलोली पाथमिक केंद्रात दाखल केले. मात्र उपचार घेत असतानाच शैलेश जाधव याचा मृत्यू झाला, तर रोहितला अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. गुहागर पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पवनकुमार कांबळे करत आहेत.
खेड-कुडोशीनजीक अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
दुसऱ्या घटनेत खेड-आंबवली मार्गावरील कुडोशी-जांभुळवाडी येथे झालेल्या दुचाकी अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. दीपक बाबाजी कदम असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. दीपक कदम हे दुचाकीने खेड येथून कुडोशी येथे जात असताना अज्ञात डंपरसारख्या वाहनातून येणाऱ्या प्रखर प्रकाशझोतामुळे डोळे दीपल्याने त्यांचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर पडून जवळच रस्त्याच्या बाजूला ठेवलेल्या विद्युतखांबावर आदळले. या बाबत सुनील बाजी कदम यांनी येथील पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. या अपघाताचा अधिक तपास प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रकाश मोरे करत आहेत.
साखरपा येथे अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार
तिसऱ्या घटनेत रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील साखरपा गोवरेवाडी येथे दुचाकी अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली. यात दोघेजण गंभीर जखमी असून अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे.
साखरपा येथील विजय जाधव हे दुचाकी घेऊन कोल्हापूरवरून संगमेश्वरकडे जात होते. साखरपा गोवरेवाडी येथे दुचाकीला अपघात घडला. अपघातात विजय जाधव (50) हे जागीच गतप्राण झाले. तर सविता विजय जाधव, अजय विजय जाधव हे दोघे गंभीर जखमी झाले. जखमी झालेल्या दोघांना साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आणण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी रत्नागिरी येथे हलवण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच साखरपा पोलीस दूरक्षेत्राचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार यांच्या मार्गदर्शनाखली संदेश जाधव, अर्पिता दुधाने, राहुल गायकवाड, प्रशांत नागवेकर करीत आहेत. रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्याचे काम सुरू होते.









