उत्तर भारतात थंडीची लाट ः राजस्थान, मध्यप्रदेशसह सात राज्यांमध्ये कडाक्याच्या थंडीचा इशारा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
उत्तर भारतात थंडीचा प्रकोप वाढला आहे. मध्यप्रदेश, राजस्थान, दिल्ली, चंदीगड, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील अनेक भागात सोमवारी सकाळी थंडीच्या लाटेमुळे दाट धुके पसरले होते. या राज्यांमध्ये तीव्र थंडीचा इशारा हवामान खात्याने जारी केला आहे. गेल्या 24 तासात येथील तापमान 3 ते 7 अंशांच्या दरम्यान नोंदवले गेले. दिल्लीत थंडी वाढली असून पारा 3 अंशावर पोहोचला आहे. तसेच राजस्थानमधील चुरू येथे सोमवारी सकाळी शून्य अंश तापमानाची नोंद झाली. येथे विक्रमी पातळीपर्यंत तापमान घसरल्यामुळे दृश्यमानताही खूपच कमी झाली होती. दाट धुके आणि थंडीमुळे उत्तर भारतात रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
31 डिसेंबर ते 4 जानेवारी हे पाच दिवस या मोसमातील सर्वात थंड दिवस असू शकतात, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यादरम्यान पंजाब, हरियाणाच्या काही भागात रात्रीचे तापमान उणेपर्यंत खाली जाऊ शकते. तर दिल्ली, राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये रात्रीचे तापमान 1 ते 4 अंशांच्या दरम्यान राहील. दिवसाचे कमाल तापमान 10 ते 14 अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्मयता वर्तविण्यात आली आहे. तसेच 29 डिसेंबरनंतर डोंगराळ राज्यांमध्ये जोरदार हिमवर्षाव होणार आहे. काही ठिकाणी पावसाचीही शक्मयता असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दिल्लीतील अनेक भागात सोमवारी सकाळी 8 ते 10 या वेळेत पारा 3 अंशांवर पोहोचला. हवामान खात्याने याआधीच येथे यलो अलर्ट जारी केला होता. दिल्लीच्या पालममध्ये किमान तापमान 6.5 अंश, सफदरजंग 5 अंश, आयानगर 4.0 अंश, रिजमध्ये 4.1 अंश नोंदवले गेले. दिल्ली परिसरात येत्या चार-पाच दिवसात थंडीचा कडाका वाढण्याची शक्मयता वर्तवण्यात आली आहे.
राजस्थानात पारा उणे पातळीवर
राजस्थानमध्येही थंडीची लाट कायम आहे. नाताळच्या दिवशी राज्यात कडाक्मयाच्या थंडीला सुरुवात झाली. रविवारी हंगामात प्रथमच दोन शहरांचे तापमान मायनसमध्ये गेले. माउंट अबूमध्ये पारा उणे 0.5 वर पोहोचला होता, तर जयपूर येथे जोबनेरमध्ये उणे एक अंश तापमानाची नोंद झाली आहे. जयपूर शहरवासियांनी सोमवारी मोसमातील सर्वात थंड रात्र अनुभवली. येथे पारा 6.6 अंश सेल्सिअस नोंदवला गेला. तसेच सीकर, फतेहपूरसह 11 शहरांमध्ये तापमान 5 अंशांच्या खाली घसरले.
मध्यप्रदेशात तापमान 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी
उत्तरेकडील वाऱयांमुळे मध्यप्रदेशात अनेक जिल्हय़ांमध्ये रात्रीचे तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली आले आहे. दतिया सर्वात थंड राहिला. येथील किमान तापमान 6 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले. याशिवाय धार, गुना, ग्वाल्हेर, पंचमढी, राजगड, रतलाम, खजुराहो, नौगाव आणि सागर येथे किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली गेले. पुढील 48 तास हवामान असेच राहील, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
उत्तराखंडमध्ये हिमवर्षाव
उत्तराखंडमधील अनेक भागात जोरदार हिमवर्षाव होत आहे. सोमवारी सकाळी अनेक भागात तापमान 10 अंशांच्या खाली राहिले. राज्यातील वासुकी तलाव पूर्णपणे गोठला आहे. गंगोत्री ते केदारनाथ या मार्गावर हा तलाव येतो. राज्यातील डोंगरभागात हिमवृष्टी होत असल्याने जनजीवन विस्कळीत होत असल्याचे दिसून येत आहे.









