वार्ताहर / तुडये
बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशय पाणलोट क्षेत्रात सलग चौथ्या दिवशीही पावसाने जोर दिल्याने पाणीपातळीत वाढ झाली आहे. बुधवारी नोंद झालेल्या 2455.80 फूट पाणीपातळीत गुरुवारी सकाळपर्यंत 24 तासांत 3.10 फुटाने पाणीपातळी वाढ झाली. त्यामुळे पाणीपातळी 2458.90 फूट इतकी झाली आहे. 1 जुलै रोजीच्या निचांकी 2447 फूट पाणीपातळीत आता 12 फूट पाणी वाढले आहे. गुरुवारी पावसाचा जोर कायम राहिल्याने दिवसभरात 1.60 फूट पाणीपातळीत वाढ होत सायंकाळी 6 वाजता पाणीपातळी 2460.50 फूट इतकी झाली. जलाशय पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजूनही 15 फूट पाण्याची आवश्यकता आहे. मागीलवर्षी 17 जुलै 2022 रोजी जलाशयाची पाणीपातळी कमी करण्यासाठी वेस्टवेअरचे दोन दरवाजे फुटाने उघडण्यात आले होते.









