सीबीआयकडून कारवाई : दुर्घटनेत 292 जणांचा झाला होता मृत्यू
वृत्तसंस्था/ बालासोर
ओडिशाच्या बालासोर येथे 2 जून रोजी झालेल्या भीषण रेल्वे दुर्घटनेप्रकरणी सीबीआयने रेल्वेच्या 3 कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. तिन्ही आरोपींना भादंविचे कलम 304 अंतर्गत अटक करण्यात आली आहे. या दुर्घटनेत 292 प्रवाशांना जीव गमवावा लागला होता. अरुण कुमार महंत (ज्युनियर इंजिनियर), एमडी आमिर खान (ज्युनियर सेक्शन इंजिनियर) आणि पापु कुमार (तंत्रज्ञ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या विरोधात भादंविचे कलम 201 (गुन्ह्याचे पुरावे गायब करणे किंवा गुन्ह्याबद्दल चुकीची माहिती देणे) अंतर्गत देखील गुन्हा नोंद आहे.
बालासोरमधील बहानगा बाजार रेल्वेस्थानकानजीक ही दुर्घटना झाली होती. तेथनू दररोज सुमारे 170 रेल्वेगाड्या धावत असतात. दुर्घटनेनंतर सीबीआयने लॉग बुक, रिले पॅनेल आणि उपकरणे जप्त करत या स्थानकाला सील केले होते. सध्या या स्थानकावर कुठलीच रेल्वेगाडी थांबू शकत नाही.
अनेक अधिकाऱ्यांवर कारवाई
बालासोरमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर रेल्वेच्या दक्षिणपूर्व विभागाच्या अनेक अधिकाऱ्यांवर कारवाई झाली आहे. पूर्व विभागाच्या महाव्यवस्थापक अर्चना जोशी यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अनिल कुमार मिश्रा यांना दक्षिणपूर्व विभागाच्या महाव्यवस्थापकपदी नियुक्त करण्यात आले आहे.
चौकशी अहवालात मानवी चुकीचा उल्लेख
बालासोर येथील रेल्वे दुर्घटनेप्रकरणी रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी अलिकडेच चौकशी अहवाल रेल्वे बोर्डाला सोपविला आहे. अहवालात ‘मानवी चूक’ आणि कोरोमंडल एक्स्प्रेसला ‘चुकीचा सिग्नल’ देण्यात आल्याचे नमूद आहे. परंतु अहवालातील उर्वरित माहिती गोपनीय ठेवण्यात आली आहे. रेल्वे बोर्ड आता सीबीआयच्या चौकशी अहवालाची प्रतीक्षा करत आहे.









