5 ते 6 नक्षलवाद्यांनाही कंठस्नान ः छत्तीसगडमधील सुकमा येथे संघर्ष
सुकमा / वृत्तसंस्था
छत्तीसगडमधील सुकमा येथे शनिवारी नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत तीन डीआरजी (जिल्हा राखीव दल) जवान हुतात्मा झाले, तर दोन जवान जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. एएसआय रामुराम नाग, साहाय्यक कॉन्स्टेबल कुंजम जोगा आणि कॉन्स्टेबल वंजाम भीमा अशी हुतात्म्यांची नावे आहेत. जगरगुंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेत 5 ते 6 नक्षलवादीही मारल्याचा दावा सुरक्षा दलाकडून करण्यात आला. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी जवानांच्या हौतात्म्याबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला. जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असे ट्विट त्यांनी केले आहे.
छत्तीसगडमधील सुकमा जिह्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन डीआरजी जवानांना प्राण गमवावे लागले. मोहीमेवर निघालेल्या सुरक्षा जवानांना हेरून नक्षलींनी केलेल्या गोळीबारात 5 ते 6 नक्षलवादीही मारले गेले आहेत, असे सुकमाचे एसपी सुनील शर्मा यांनी सांगितले. या संघर्षावेळी जवळपास 100 नक्षलवादी उपस्थित असल्याचा संशयही सुरक्षा दलाने व्यक्त केला. जगरगुंडाजवळील पोलीस छावणीतील जवानांचा ताफा घटनास्थळी पाठवून शोध सुरू आहे. शोधकार्यासाठी गेलेल्या डीआरजी जवानांना छावणीत परत पाठवण्यात आले आहे. ज्या भागात चकमक झाली तो भाग पूर्णपणे नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला आहे. नक्षलवादी कमांडर हिडमा येथे सक्रिय आहे. या चकमकीत अनेक कट्टर नक्षलवादी असल्याचीही चर्चा आहे.
डीआरजीचे जवान जगरगुंडा-कुंदेड दरम्यान रस्ता बांधणीच्या कामासाठी नक्षल ऑपरेशन आणि सुरक्षेवर होते. याठिकाणी अगोदरच घुसलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. सैनिकांनीही या गोळीबाराला रोखठोक प्रत्युत्तर दिल्याने मोठी जीवितहानी टळल्याचे सांगण्यात आले.
जगरगुंडा हा नक्षलींचा बालेकिल्ला
सुकमा जिह्यातील जगरगुंडा हे गाव जगदलपूरपासून सुमारे 200 किमी अंतरावर असून दक्षिण बस्तरस्थित दंतेवाडा, विजापूर आणि सुकमा या तीन जिल्हय़ांच्या सीमेवर वसलेले आहे. हा भाग नक्षलवाद्यांच्या उपराजधानीचे ठिकाण म्हणूनही ओळखले जाते. नक्षलवादी कमांडर जगन्ना पहिल्यांदा 1980-85 दरम्यान या गावात आला होता. बंदुकीच्या जोरावर त्यांनी गावकऱयांवर राज्य केले. त्यानंतर जगन्ना येथून दुसऱया भागात गेल्यावर नक्षलवादी कमांडर पापाराव यांनी या भागाची जबाबदारी घेतली. काही काळानंतर येथे नक्षलवादी कमांडर हिडमा याचे वर्चस्व निर्माण झाले होते.









