उपराज्यपाल मनोज सिन्हांकडून मल्टीप्लेक्सचे उद्घाटन
वृत्तसंस्था / श्रीनगर
काश्मीर खोऱयात मोठय़ा पडद्यावर चित्रपट पाहण्याची प्रतीक्षा आता संपुष्टात आली आहे. श्रीनगरच्या सोनमर्गमध्ये मंगळवारी उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी पहिल्या मल्टीप्लेक्स सिनेमा हॉलचे उद्घाटन केले. काश्मीरमधील पहिल्या पहिला मल्टीप्लेसमध्ये 520 आसनांची एकूण क्षमता असणारी तीन चित्रपटगृहे असतील. स्थानिक खाद्यपदार्थांना चालना देण्याच्या उद्देशाने परिसरात एक फूड कोर्टही असणार आहे.
विज्ञान जर शोध असेल तर कला त्याची अभिव्यक्ती असल्याचे उद्गार यावेळी सिन्हा यांनी काढले आहेत. मल्टीप्लेक्समध्ये मंगळवारी आमिर खानचा चित्रपट लाल सिंह चड्ढा दाखविण्यात आला आहे.
काश्मीरमध्ये चित्रपटगृहे बंद झाल्याने तेथील अनेक जणांना चित्रपटगृह आणि मल्टीप्लेक्स कसे असते हेच माहित नव्हते. येथील लोकांना 300 किलोमीटर अंतरावरील जम्मूमध्ये जात चित्रपट पाहण्याची इच्छा पूर्ण करावी लागत होती. काश्मीरमध्ये 1990 मध्ये दहशतवादी संघटनांच्या धमक्या आणि हल्ल्यांमुळे सर्व चित्रपटगृहे बंद झाली होती.









