उत्तराखंडमध्ये ‘घात’सत्र सुरूच : बेपत्ता झालेल्यांपैकी 17 नेपाळींचा समावेश
वृत्तसंस्था/ देहराडून
उत्तराखंडच्या गौरीकुंडमध्ये भूस्खलनामुळे तिघांचा मृत्यू झाला, तर 20 जण बेपत्ता झाले. ऊद्रप्रयाग जिह्यातील केदारनाथ धाम यात्रेच्या मार्गावर ही दुर्घटना घडल्याची माहिती उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार यांनी दिली. घटनास्थळी बचाव पथक मदतकार्य व शोधमोहीम राबवत आहे. बेपत्ता झालेल्यांपैकी 17 नेपाळचे नागरिक आहेत.
उत्तराखंडमध्ये कोसळत असलेल्या पावसामुळे नैसर्गिक आपत्तींचे सत्र सुरूच आहे. रुद्रप्रयाग आणि गौरीपुंड येथील मोठ्या भूस्खलन दुर्घटनांबरोबरच अन्यत्रही छोट्या-मोठ्या घटना घडल्या आहेत. टिहरी गढवाल जिल्ह्यात शनिवारी रात्री पावसामुळे घराची भिंत कोसळली. भिंतीखाली दबून दोन मुलांचा मृत्यू झाला. दुसरीकडे नैनितालमध्ये पुलावरून जाणारी बस उलटली. बसमधील 35 जणांना जेसीबीच्या मदतीने वाचवण्यात यश आल्याचे सांगण्यात आले.
काश्मीर, मध्यप्रदेशमध्येही पडझड
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यातही रविवारी सकाळी दरड कोसळल्यामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग टी-2 बोगद्याजवळ रोखण्यात आला. तासाभराच्या प्रयत्नानंतर प्रशासनाने ढिगारा हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. मध्यप्रदेशातील सतना जिल्ह्यात शनिवारी संध्याकाळी बकिया बॅरेजचे 13 दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे रेवा येथील तराई भागात पुराचा धोका वाढला आहे. येथे होमगार्ड आणि एसडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.